आरोपींत अल्पवयीनांचा समावेश
कॅनबरा
ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये जाणूनबुजून आग लावल्याच्या आरोपाच्या प्रकरणी आतापर्यंत शेकडो जणांना अटक करण्यात आली आहे. आगीचा सर्वाधिक फटका बसलेल्या न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलँड, व्हिक्टोरिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया प्रांतांमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या या आरोपींमध्ये कित्येक अल्पवयीनांचा समावेश
आहे. केवळ न्यू साउथ वेल्समध्येच 183 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 24 जणांवर जाणूनबुजून जंगलांमध्ये आग लावल्याचा आरोप आहे. व्हिक्टोरियात 43 जणांना अटक करण्यात आली आहे. क्वीन्सलँडमध्ये 101 जणांना पकडण्यात आले असून यातील 70 टक्के आरोपी अल्पवयीन आहेत. 50 टक्के जागांवर आग जाणूनबुजून लावण्यात आली होती, असा दावा स्विनबर्ग विद्यापीठातील फोरेन्सिग बिहेव्हियरल सायन्सचे संचालक जेम्स ओग्लॉफ यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीचा धूर चिलीपर्यंत पोहोचला आहे.
मध्य चिलीच्या आकाशात धूराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा धूर आगामी दिवसांमध्ये अर्जेंटीनाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियात मुसळधार पाऊस
ब्लेक चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पश्चिम किनाऱयावर मंगळवारी मुसळधार पाऊस पडला आहे. ब्रूम या किनारी शहरात 102 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वाहिलेल्या वाऱयांमुळे नुकसान झाले आहे.









