टय़ुनिशियावर एकमेव गोलने मात, मिशेल डय़ुकने नोंदवला गोल
वृत्तसंस्था/ कतार
स्ट्रायकर मिशेल डय़ुकने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धेतील गट ड मधील सामन्यात टय़ुनिशियावर 1-0 अशा फरकाने संस्मरणीय विजय मिळविला. बारा वर्षांच्या खंडानंतर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात मिळविलेला हा पहिला विजय आहे.
ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धेत मिळविलेला हा एकंदर तिसरा विजय आहे. अल जनौब स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात डय़ुकने पूर्वार्धात हेडरवर टय़ुनिशियन गोलरक्षक आयमेन दाहमेनला चकवत गोल नोंदवला. विश्वचषकातील मागील सात सामन्यांत ऑस्ट्रेलियाला विजय मिळविण्यात यश आले नव्हते. या विजयाने ती मालिकाही त्यांनी खंडित केली. 2010 मधील स्पर्धेत त्यांनी सर्बियावर शेवटचा विजय मिळविला होता.
दोन सामन्यात 3 गुणांसह ऑस्ट्रेलिया गट ड मध्ये दुसऱया स्थानावर असून पहिल्या सामन्यात त्यांना विद्यमान विजेत्या फ्रान्सकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. 2006 मधील स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने शेवटच्या सोळा फेरीत स्थान मिळवित आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. त्यावेळी टिम कॅहिल, हॅरी केवेल, मार्क विडुका यासारखे अव्वल खेळाडू संघात होते.
बुधवारी होणाऱया गट साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची लढत डेन्मार्कशी तर टय़ुनिशियाची लढत फ्रान्सशी होणार आहे. टय़ुनिशियाला बाद फेरी गाठण्याची अजूनही संधी आहे. मात्र यासाठी त्यांना फ्रान्सला हरविण्याचे कठीण आव्हान पेलावे लागणार आहे.
आजचे निकाल
1) इंग्लंड बरोबरी वि. अमेरिका 0-0
2) ऑस्ट्रेलिया विजयी वि. टय़ुनिशिया 1-0
3) पोलंड -सौदी अरेबिया.
आजचे सामने
1) जपान वि. कोस्टारिया
वेळ ः दुपारी 3.30 वा.
2) बेल्जियम वि. मोरोक्को
वेळ ः सायं. 6.30 वा.
3) क्रोएशिया वि. कॅनडा
वेळ ः रात्री 9.30 वा.
4) स्पेन वि. जर्मनी
वेळ ः मध्यरात्री 12.30 वा.









