वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मर्व्ह हय़ुजेसचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी केली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱया 59 वर्षीय मर्व्ह हय़ुजेसच्या तैलचित्राचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून त्याचा गौरव केला जाणार आहे. 1985 ते 1994 या कालावधीत मर्व्ह हय़ुजेसने 53 कसोटीत 28.38 धावांच्या सरासरीने 212 बळी बाद केले आहेत. तसेच त्याने 33 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. विंडीजविरूद्ध वाका मैदानावर 1988 साली झालेल्या कसोटी सामन्यात हय़ुजेसने एका डावात 87 धावांत 8 बळी घेतले होते. हय़ुजेसची ही सर्वोत्तम कामगिरी म्हणून ओळखली जाते. 33 वनडे सामन्यात हय़ुजेसने 38 बळी नोंदविले आहेत. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर हय़ुजेस 2010 सालापर्यंत ऑस्ट्रेलियन निवड समितीचा सदस्य होता.









