व्हिएन्ना
कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांवर जास्तीत जास्त दंडाची रक्कम आकारण्याचा इरादा ऑस्ट्रिया सरकारने नुकताच व्यक्त केला आहे. यासंदर्भातील योजना सरकारने आखली असून याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
14 वर्षे व त्यावरील सर्व जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य असल्याचे सरकारने जाहीर केले होते. सरकारच्यावतीने ही घोषणा आरोग्य विभागाने केली होती. असं जरी असलं तरी लस घेण्याबाबत चालढकल केली जात असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. लस न घेतलेल्या व्यक्तींवर 3600 युरो अर्थात 4000 अमेरिकन डॉलर दंड करण्याची योजना बनवली जात आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी लसीकरणाबाबतच्या सामान्य नियमांना सादर केलं जाणार असल्याचं समजतं. याअंतर्गतच दंडाची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. या कारवाईमधून मात्र गरोदर महिला, आरोग्याच्या कारणास्तव लस न घेतलेल्या रुग्णांना त्याचप्रमाणे कोरानामधून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांना वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे. सरकारच्यावतीने प्राधिकरणाकडून लस न घेतलेल्या लोकांना सूचना वजा नोटीसही पाठवल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तीन महिन्यातून एकदा ही कारवाई सरकारकडून केली जाणार आहे. ऑस्ट्रियामध्ये एकूण लोकसंख्येच्या 68 टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे.









