चंदिगढ / वृत्तसंस्था
ऑलिम्पिक पदकविजेता पेहलवान सुशील कुमार याला शनिवारी रात्री पंजाबमध्ये अटक करण्यात आली. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये घडलेल्या पेहलवान सागर राणा हत्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सुशीलकुमार याच्यासोबतच त्याचा सहकारी अजय कुमार यालाही ताब्यात घेण्यात आले असून दोघांनाही पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे. अटकेतील दोघांचाही सागरच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील एक फ्लॅट रिकामा करून घेण्यावरून झालेल्या वादादरम्यान ही हत्येची घटना घडली होती.
दिल्ली पोसिलांनी सुशील कुमारची माहिती देणाऱयाला 1 लाख रुपये तर अजय कुमारची माहिती देणाऱयालाही 50 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. मागील आठवडय़ातच दिल्लीच्या एका न्यायालयाने छत्रसाल मर्डर प्रकरणात सुशील कुमार आणि इतर सहा आरोपींविरोधात विनाजामीन अटक वॉरंट जारी केले होते. याच्या काही दिवस आधीच सुशील कुमारविरोधात लुकआउट नोटीसदेखील जारी करण्यात आली होती. या प्रकरणात जखमी झालेल्यांचे जबाब पोलिसांनी याआधीच नोंदवले आहेत. सुशील कुमारला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांमध्येदेखील धाडी टाकल्या होत्या. मात्र, तो बरेच दिवस फरार होता. आता मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तो पंजाबमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचत अटकेची कारवाई केली.









