वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो 2020 साठी मार्गस्थ असणारी ऑलिम्पिक क्रीडाज्योत बुधवारी फुकुशिमा प्रीफेक्चरकडे सुपूर्द केली गेली. पुढील एक महिनाभर ही क्रीडाज्योत याच ठिकाणी प्रदर्शनार्थ ठेवली जाईल. पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे टोकियो ऑलिम्पिकची ही क्रीडाज्योत जागतिक प्रवासाला रवाना झाली. पण, यादरम्यान ही स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडाज्योतीचा एका महिन्यानंतरचा प्रवास कसा असेल, हे अद्याप अनिश्चित आहे.
मुबलक हंगामी फळांच्या उपब्लधतेमुळे फुकुशिमाला प्रुट किंगडम म्हणून ओळखले जाते. येथे प्रत्येक महिन्यात जवळपास एक नवे हंगामी फळ बाजारात येते. या ठिकाणी ऑलिम्पिक क्रीडाज्योतीचा पुढील एक महिना मुक्काम असेल. फुकुशिमातील जे-व्हिलेज नॅशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये एका छोटेखानी सोहळय़ात क्रीडाज्योत प्रदान केली गेली. टोकियो 2020 सीवोवो युकिहिको नुनोमुरा आयोजन समिती सदस्य या नात्याने येथे हजर राहिले. या सोहळय़ासाठी त्यांनी जपानच्या उत्तर भागातून इथपर्यंतचा प्रवास केला.
‘अवघे जग कोव्हिड-19 चा लढा देत आहे आणि मानवी मुल्याची सर्वोत्तम जपणूक म्हणून आम्ही या छोटेखानी स्वागत सोहळय़ाकडे पाहतो’, असे नुनोमुरा स्वागताप्रसंगी म्हणाले. नंतर त्यांनी फुकूशिमा प्रशासनाचे प्रतिनिधी माकोटो नोजी यांच्याकडे क्रीडाज्योत सुपूर्द केली. ‘पुढील वर्षी ऑलिम्पिक क्रीडाज्योत पुन्हा जे-व्हिलेजमधून प्रवासाला सुरुवात करेल, त्यावेळी आपण कोणत्याही अडचणीवर मात करु शकतो, असा संदेश दिला जाईल’, असे नोजी याप्रसंगी म्हणाले.
सुधारित रुपरेषेनुसार, दि. 30 एप्रिलपर्यंत ऑलिम्पिक क्रीडाज्योत येथे प्रदर्शनार्थ असेल. त्यानंतर ती टोकियोकडे रवाना होईल. जपानच्या राजधानीत या क्रीडाज्योतीचे प्रदर्शन कुठे ठेवायचे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सुधारित वेळापत्रकानुसार, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी दि. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होईल, असे जाहीर केले गेले आहे. 121 दिवसांच्या क्रीडाज्योतीची सुरुवात करण्यासाठी जे-व्हिलेजची निवड केली गेली. 2011 मधील भूकंप व त्सुनामीतून जपान सावरले, त्याचे जे-व्हिलेज हे प्रतीक मानले जाते.









