चित्रातील फूल कितीही सुंदर दिसलं, तरीही त्याचा सुगंध घेता येतो का ? तर नाही… सुगंध घेण्यासाठी फुल हातात असायला हवं, अनुभवता यायला हवं… अगदी तसेच जसे घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून… आपल्या संस्कृतीत जीवन म्हणजे अनंत उत्सवांनी नटलेला सोहळा आणि त्यामधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे लग्न सोहळा. आतापर्यंत एका व्हिडिओ कॉलवर साऱया भेटीगाठी पार पडत, मन जुळत, मैत्री होत असे… पण, ऑनलाईन लग्नाच्या गाठी जुळतील? असंच काहीसं आपल्या शंतनू दृ शर्वरीचा आयुष्यात घडणार आहे. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे गोड नातं ऑनलाईनच हळूहळू फुलू लागलं… यानंतर रंगलेला लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत म्हणजे कलर्स मराठीवरील नवीन मालिका शुभमंगल ऑनलाईन. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशाप्रकारचा लग्नसोहळा रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
सुबोध भावे (कान्हाज् मॅजिक) निर्मित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित शुभमंगल ऑनलाईन ही मालिका 28 सप्टेंबरपासून रात्री 9.30 वाजता कलर्स मराठीवर सुरू होत आहे. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुकन्या कुलकर्णी – मोने, अमिता खोपकर, सायली संजीव, सुयश टिळक, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत. लग्नाच्या मंगलाष्टकांमधला शुभमंगल सावधान यातला सावधान हा शब्द सध्या अत्यंत महत्वाचा आहे. आणि यालाच लक्षात घेता शंतनू आणि शर्वरीच्या भेटीगाठी ऑनलाईनच सुरू होतात. शंतनू सदावर्ते महत्वाकांक्षी आणि अतिशय देखणा असा एअर लाईनमध्ये काम करणारा आजच्या पिढीतील तरुण आहे. ज्याचा लग्न करण्याला नकार आहे तर शर्वरी अत्यंत हुशार, स्वभावाने मस्त, बिनधास्त, मनमिळाऊ अशी मुलगी आहे. माणूस वाईट नसतो, परिस्थितीमुळे तो तसा वागतो असे तिचे एकंदरीतच मत आहे. खरंतर दोघांच्या स्वभावातील विरोधाभास गमतीदार आहे आणि हेच त्यांच्या नात्यातील विशेष आहे. शंतनू आणि शर्वरीचे आयुष्य पूर्णपणे बदलते जेव्हा ऑनलाईन भेटीगाठीतून त्यांचे नाते लग्नाच्या महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन थांबते. आणि मग दोघांच्या घरात एकच लगबग उडते शुभमंगल ऑनलाईन.
कार्यक्रमाविषयी बोलताना मालिकेचे निर्माते सुबोध भावे म्हणाले, ’माणूस एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच वेगवेगळी माध्यमं शोधून काढतो, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष. प्रेम करणाऱया शर्वरी आणि शंतनू यांनीही असंच प्रेमाचं वेगळं माध्यम शोधून काढलं आहे, त्याचीच ही गोष्ट ! याआधी बरेचसे ग्राऊंड एवेंट्स प्रोडय़ूस केले, मालिका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक दिवस मालिकेची निर्मिती करावी अशी इच्छा होती पण हवीतशी क्रिप्ट मिळत नव्हती. लॉकडाऊनच्या काळात शुभमंगल ऑनलाईन या मालिकेची गोष्ट आली, जी आम्हां सगळ्यांना आवडली आणि ती आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे असे त्यांनी सांगितले.
याच दिवसापासून सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका रात्री 10.00 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.









