मत्स्य खात्याचे दुर्लक्ष, विपेत्याचा निरुत्साह, खवय्यांतून नाराजी
बेळगाव / प्रतिनिधी
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत मत्स्य खात्याने राबविलेली ऑनलाईन घरपोच मासे अभिनव योजना बारगळली आहे. त्यामुळे मत्स्य खवय्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. खात्याच्या या योजनेकडे विपेत्यांनी पाठ फिरविल्याने खवय्यांना ऑनलाईन माशांपासून दूर रहावे लागले आहे. बेंगळूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात आली होती. दरम्यान योजनेला प्रतिसाद देखील मिळाला होता. मात्र काही दिवसांत या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.
मत्स्य खात्याच्या या योजनेमुळे खवय्यांना बाजारात जाऊन मासे आणण्याची देखील तसदी घ्यावी लागणार नव्हती. खवय्यांना विविध जातीचे मासे ऑनलाईन उपलब्ध होणार होते. याकरिता मत्स्य खात्याने एक ऍप देखील कार्यान्वित केला होता. या योजनेंतर्गत हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होणार होता. या योजनेकडे साफ दुर्लक्ष झाल्याने खवय्यांना माशांसाठी बाजारात फिरावे लागत आहे.
जिल्हय़ात मत्स्याहार करणाऱयांची संख्या अधिक आहे. दरम्यान खवय्यांना मासे खरेदीसाठी बाजारात धावपळ करावी लागते. याकरिता योजना अमलात आणण्यात आली होती. शिवाय या योजनेमुळे ग्राहकांना वेळेत व ताजे मासे उपलब्ध होणार होते. तसेच मत्स्य खात्याच्या ऍपवरून दर आणि माशांच्या विविध जाती सांगितल्या जात होत्या. त्यामुळे खवय्ये घरबसल्या ऑनलाईन मासे मागवून जिभेचे चोचले पुरवू शकणार होते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित मासे विक्रीला प्राधान्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली होती. मात्र काही दिवसांत योजना रखडल्याने मासे खवय्यांना ऑनलाईन मासे खरेदीपासून वंचित रहावे लागले आहे
एम. व्ही. कुलकर्णी (उपनिर्देशक, मत्स्यपालन खाते, बेळगाव)
सध्या पण ऑनलाईन मत्स्य विक्री योजना सुरू आहे. मात्र ऑनलाईन विक्री करणारे विपेतेच निरूत्साही दिसत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खात्याकडे विपेते आले नाहीत. त्यामुळे या योजनेला गती आली नाही. मत्स्य विभागाने ग्राहकांच्या सोयी-सुविधासाठी ऑनलाईन मासे विक्री सुरू केली होती. मात्र विपेत्याकडूनच म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.









