टायर थ्री शहरे आघाडीवर-मुलांच्या कपडय़ांची मागणी सर्वाधिक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय ऑनलाइन फॅशन उद्योगाचा विकास आर्थिक वर्ष 2021 मध्ये 51 टक्क्यांनी वाढीव दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. ई-कॉमर्सच्या उद्योगात नवा अध्याय रचला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यंतच्या मागणीचा विचार करता टायर थ्री शहरात 192 टक्के इतकी अधिक मागणी नोंदवण्यात आली आहे. तर ऑनलाइन मागणीत मुलांच्या कपडय़ांना जोरदार मागणी राहिली असल्याचे दिसून आले आहे. ही वाढ चक्क 200 टक्के अधिक दिसली आहे. ऑनलाइन विक्रीसंबंधीची फर्म युनिकॉमर्सने केलेल्या पाहणीत वरील बाब स्पष्ट झाली आहे. थेट ग्राहकांपर्यंत फॅशन उत्पादने पोहचवण्याच्या कार्यात ई-कॉमर्स कंपन्या उत्तम कामगिरी पार पाडत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी लागणारी आवश्यक ती गुंतवणूक करण्यासही कंपन्या राजी झाल्या आहेत. ई-कॉमर्सच्या एकंदर व्यवसायाचा विचार केल्यास फॅशन उत्पादनांचा वाटा लक्षणीय राहिला आहे. टायर टू आणि टायर थ्री शहरांनी याबाबतीत आघाडी उघडली असल्याचे दिसून आले आहे.
महिला पोषाखांची मागणी अधिक
ई-कॉमर्सच्या अंतर्गत आर्थिक वर्ष 2021 मध्ये मागणीत राहिलेल्या उत्पादनांमध्ये 50 टक्के वाटा हा महिलांच्या पोषाखांचा राहिला आहे तर या महिला पोषाखांची मागणी 30 टक्के इतकी वाढली आहे. सदरचा वाटा व मागणी ही मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नोंदली गेली आहे. पुरुषांच्या पोषाखांनी आर्थिक वर्ष 2021 मध्ये 37 टक्के वाटा नोंदवला आहे तर मागणीतदेखील 33 टक्के वाढीची नोंद केली आहे. वेस्टर्न वेअरलाही जास्तीची पसंती मिळते आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये वेस्टर्न वेअर्सची मागणी 57 टक्के अधिक राहिली आहे तर वाटा पाहता तो 65 टक्के अधिक नोंदवला गेला आहे.









