आरोग्याधिकारी डॉ. मुन्याळ यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेवेळी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने अधिक काळजी घेतली असून तिसऱया लाटेवेळी ऑक्सिजन पुरवठा कमी होणार नाही. जिह्यासाठी बिम्समध्ये नवे तीन ऑक्सिजन प्लांट उभे करण्यात आले आहेत तर तालुक्मयामध्ये पाच तसेच खासगी तीन अतिरिक्त केंदे करण्यात आली आहेत. त्यामुळे ऑक्सिजन कमी पडणार नाही. असे असले तरी प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी केले.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व ती दक्षता घेतली आहे. मुलांसाठी बिम्समध्ये 680 बेड, तालुक्मयामध्ये 180 बेडची व्यवस्था केली आहे. मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ञ कमिटी नेमण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनानुसारच लहान मुलांवर उपचार केले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दररोज 1 लाख नागरिकांचे लसीकरण
लसीकरणाबाबत ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लस जिह्यात मोठय़ा प्रमाणात देण्यात येत आहे. आतापर्यंत 65 टक्के लोकांना लस दिल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा हा सीमाभागामध्ये वसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही गावांतील नागरिकांनाही लस देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत 23 लाखांहून अधिकांना लस दिली गेली आहे.
पालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे
तिसऱया लाटेमध्ये मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करताना सॅनिटायझरचा वापर करा. मास्क, सोशल डिस्टन्स पाळा. त्यामुळे लहान मुलांना धोका होणार नाही.
सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, खोकला, ताप हे आजार वाढले आहेत. तेव्हा प्रत्येकाने लहान मुलांची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांना आणि लहान मुलांना लस देण्यासाठी अधिक प्राधान्य दिले गेले आहे. गर्भवतींनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.









