ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडनस्थित स्वीडिश कंपनी ऍस्ट्रोझेनेकाच्या वतीने विकसित करत असलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोनाप्रतिबंध लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत. तिसऱया टप्प्यांमध्ये ही लस दिल्यानंतर एका स्वयंसेवकामध्ये गंभीर दुष्परिणाम दिसल्यानंतर या चाचण्या स्थगित करण्यात आल्या. मुळातच लस विकसित करण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि क्लिष्ट स्वरूपाची असते. ती प्रक्रिया मध्येच थांबवावी लागणे हादेखील संशोधन प्रक्रियेचा एक भाग आहे. त्यामुळे यामध्ये विशेष असे काही नाही. हा धक्का या कारणासाठी की, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी विकसित करीत असलेल्या लसीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. दीडशेहून अधिक कंपन्या लस तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण या सर्वांमध्ये ऑक्सफर्डने आघाडी घेतली. पहिल्या दोन टप्प्यात या लसीने अत्यंत समाधानकारक यश मिळवले. ज्या काही हजारो स्वयंसेवकांना यापूर्वी ही लस दिली होती, त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढली. तिसऱया टप्प्यातील यशस्वी चाचण्या व परवानगीनंतर ऑक्सफर्डची लस डिसेंबरअखेरीस बाजारपेठेत सर्वप्रथम येईल, अशी अपेक्षा होती. परंतु चाचण्यांना स्थगिती मिळाल्याने लवकरात लवकर लस उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना तात्पुरती का होईना खीळ बसली, हे निश्चित. तथापि, नाउमेद होण्याचे कारण नाही. कारण कोणताही संशोधक हा कधीच हार मानत नाही अथवा एखाद्या अडथळय़ानंतर प्रयत्न सोडून देत नाही. हा आजपर्यंतच्या संशोधन प्रवासाचा इतिहास आहे. देवी, पोलिओ, फ्लू, इबोला यासारख्या महाभयंकर रोगांवर अनेक अडचणीनंतर आपण लसीकरणातूनच मात केली आहे. परिणामी या समस्येतूनही निश्चितपणे मार्ग निघेल व ही लस लवकरच बाजारात येईल, यात संदेह नाही. कोरोना संसर्गाच्या थैमानामुळे गेल्या आठ महिन्यात जगभरात 9 लाखाहून अधिक बळी गेले, करोडो बेरोजगार झाले, तेवढेच देशोधडीला लागले. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे विविध उपाय करूनही लोकांना आजही भीती आणि दडपणाच्या छायेखाली वावरावे लागते हे वास्तव आहे. या सर्वांवर लस हाच एक रामबाण उपाय असल्याने संपूर्ण जगाचे डोळे कोरोनाप्रतिबंधक लसीकडे लागले आहेत. भारतासारख्या खंडप्राय आणि लोकसंख्येचा विस्फोट झालेल्या 130 कोटींच्या देशात या घडीला कोरोनाप्रतिबंधक लसीची अत्यंत निकड आहे. ऑक्सफर्डच्या वतीने भारतात सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून 17 ठिकाणी त्याच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू होत्या. त्या आता थांबवल्या आहेत. भारताच्या दृष्टीनेही हा धक्का मानावा लागेल. कोरोना महामारीचे अतिशय गंभीर परिणाम देशावर झाले. मुळातच गेली काही वर्षे आपली अर्थव्यवस्था लडखडत वाटचाल करीत होती. त्यातच कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला. हा गाडा आणखीनच गाळात रूतला. सध्या आपली वाटचाल आर्थिक विपन्नतेकडे सुरू आहे. अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी सर्व व्यवहार, उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू करणे आवश्यक आहे. प्रसंगी धोका पत्करून लोक व्यवहार सुरू करत आहेत. कोरोनापासून सुरक्षितता म्हणून घरी बसावे तर उपासमारीने मरण्याची भीती. म्हणूनच अदृश्य शत्रूच्या छायेत मृत्यूची टांगती तलवार घेऊन लोक घराबाहेर पडले. अनलॉक 3 आणि 4 नंतर त्याचे गंभीर परिणाम व्हायचे तेच झाले. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. आज देशात प्रतिदिनी सुमारे 1 लाख रुग्णांची भर पडत आहे. आजमितीस तिची वाटचाल 50 लाखांकडे सुरू आहे. पाऊण कोटी लोकांचा बळी गेला. ब्राझीलला मागे टाकत आपण दुसऱया स्थानी पोहोचलो, हे आणखी एक दुर्दैव. अपुरी वैद्यकीय साधनसामुग्री, वैद्यकीय कर्मचाऱयांची प्रचंड कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव, लोकसंख्येची घनता, काळजी व उपाययोजनांबाबत कमालीची उदासीनता, अज्ञान यामुळे नजीकच्या काळात रुग्णवाढीचा स्फोट होण्याची शक्यता तज्ञ वर्तवत आहेत. म्हणूनच या संभाव्य महाभयंकर संकटाला रोखण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लस भारताच्या दृष्टीने अतिशय वरदायिनी ठरणार आहे. या सर्वांमध्ये सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील सर्वाधिक लसीचे उत्पादन याठिकाणी होते. डिसेंबर अखेर 250 दशलक्ष डोसचे उत्पादन तयार ठेवण्याचे सिरमचे उद्दिष्ट होते. यापैकी 50 टक्के लसीचा वाटा भारत सरकारकडे देण्यात येणार होता. सिरममध्ये कमी कालावधीत मोठय़ा प्रमाणात ऑक्सफर्डच्या लसीच्या उत्पादनाचे प्राथमिक टप्पे सुरू झाले होते. याचाच अर्थ कोरोनाला हरवण्यासाठी ऑक्सफर्डची लस फिनिशिंग लाईनजवळ आली होती. दुर्दैवाने त्यांना या शर्यतीत मध्येच थांबावे लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट नक्कीच दखलपात्र, कौतुकास्पद आहे. ती म्हणजे या घडीला ऑक्सफर्डच्या पहिल्या, दुसऱया आणि तिसऱया टप्प्यात जगभरात जवळजवळ 50 हजारांहून अधिक स्वयंसेवकांवर चाचणी केली आहे. यापैकी एकावर दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास येताच व धोक्याची घंटा वाजल्यानंतर जगभरातील सर्व चाचण्या थांबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यशाच्या सीमारेषेवर उभे असतानाच केवळ आणि केवळ मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. आजपर्यंतच्या यशस्वी लसीकरण संशोधनाचे हे गमक मानावे लागेल. त्यामुळे निश्चितच ते अभिनंदनास पात्र आहेत. ऑक्सफर्डशिवाय तिसऱया टप्प्यात प्रवेश करणाऱया नऊ कंपन्यांचे संशोधन सुरू आहे. रशियाच्या स्पुटनिक-5 ची पहिली बॅच रशियन जनतेसाठी खुली झाली आहे. रशिया सरकारने भारताकडे संपर्क साधून भारतात त्याच्या उत्पादनासाठी परवानगी मागितली आहे. कदाचित ती दिली जाईल. ऑक्सफर्डशिवाय सिरममध्ये त्यांच्या स्वतःच्या दोन कोरोनाप्रतिबंधक लसीवर संशोधन सुरू आहे. सिरमचा नोव्हावॅक्स या कंपनीबरोबर करार झाला आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन, अमेरिकेची मॉडर्ना या सर्व लसींचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. सारांश, हे सर्व चित्र आशादायक आहे, हे नक्की.
Next Article दापोलीत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








