वार्ताहर / कास :
वाचून आश्चर्य वाटेल पण जागतिक वारसास्थळ असलेल्या व जैवविविधतेचे आगार असलेल्या कास पठाराच्या फुलांच्या जीवनमानात बदल होत असून, चक्क ऑक्टोबरमध्ये येणारी फुले ऑगस्टमध्ये आली असून, यावर्षी पठारावर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये गेंद, सितेची आसव इत्यादी फुले ही अद्याप फुललेली नाहीत. त्यामुळे कासच्या फुलांच्या जीवनमानात काही बदल होतोय का याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे.
कास पठार ते राजमार्ग या रस्त्याच्या उजव्या बाजूला अडीच हेक्टर परिसरात कुमुदिनी तलाव पसरलेला आहे. या तलावामध्ये कुमुदिनी (निम्फॉईडस इंडिकम) ही पृष्ठभागावर आढळते तर पाण्याच्या तळाला रोटाला ही वनस्पती आढळते. याची पाने पाण्यावर तरंगतात. त्याच्यावर पांढरी केसरयुक्त फुले येतात. याची मुळे पाण्यातून माती भागापर्यंत अन्न शोषण्यासाठी तरंगतात. उन्हाळ्यात पाणी आटून गेल्यावर मुळ्या व कंद जमिनीमध्ये सुकून जातात. पुनः पावसाळा आला की ही वनस्पती जीवंत होते. कुमुदिनी तलावातील ऑक्टोबरमध्ये येणारी ही फुले चक्क ऑगस्टमध्ये आली आहेत. पहिल्यांदाच हा बदल घडला असून याबाबत स्थानिक संशोधक ही आश्चर्य व्यक्त करत आहेत.









