उत्पादन 42.9 लाख टनाच्या घरात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकरच सुरु झाला आहे. यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये भारतामधील साखर उत्पादन दुप्पट झाल्याची माहिती उद्योग संघटना भारतीय साखर कारखाना संघ ( इस्मा) यांनी दिली आहे.
सदरच्या दोन महिन्यातील (ऑक्टो-नोव्हेंबर)साखर उत्पादन दुप्पटीसह वधारल्याची नोंद केली आहे. साखर उत्पादन व्यापारी वर्ष 2020-21 च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीदरम्यान 42.9 लाख टन राहिल्याची माहिती आहे. एक वर्षाच्या समान कालावधीत 20.72 लाख टन साखर उत्पादन झाल्याची नोंद आहे.
साखर उद्योग असोसिएशन यांच्या माहितीनुसार यंदा साखर कारखान्यांचा हंगाम नेहमीपेक्षा लवकर सुरू झाला. लवकर ऊस तोडणी सुरु झाल्याने साखर उत्पादन वधारत गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये साखर उत्पादन पहिल्यापेक्षा 11.46 लाख टनांनी वाढून 12.65 लाख टनावर पोहोचले आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादन 5.72 लाख टनावर राहिले आहे. जे मागील वर्षातील समान कालावधीत 1.38 लाख टन होते. महाराष्ट्रात ऊस तोडणी लवकरच सुरु केल्याने उत्पादन वाढीने वेग घेतला आहे. कर्नाटकमध्ये साखर उत्पादन 5.62 लाख टनांनी वाढून 11.11 लाख टनांवर राहिले आहे.









