पाकिस्तानचा ‘व्हर्चुअल’ सहभाग ः रशिया, चीन आदी देशांचा सहभाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या परिषदेत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी दहशतवादाचा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित केला आहे. विश्वसमुदायाने एकत्रितरित्या दहशतवाद या जागतिक संकटाचा बिमोड केला पाहिजे. कोणत्याही कारणास्तव दहशतवादावर पांघरुण घालता कामा नये. एससीओ ही संघटना जर अधिक बळकट करायची असेल तर सर्व सदस्य देशांना एकजुटीने हा संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
ही परिषद दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत पाकिस्ताचा प्रतिनिधी प्रत्यक्षरित्या उपस्थित नाही. मात्र, त्या देशाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपला सहभाग घेतला आहे. विभागीय सुरक्षा आव्हाने, त्यांच्यासंबंधीचे इतर मुद्दे, तसेच सदस्य देशांमधील द्विपक्षीय संबंध आदी विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाणार आह. लडाख आणि अरुणाचल प्रदेशात भारतीय सीमेनजीक होत असलेला भारत-चीन संघर्ष हा मुद्दा परिषदेत चर्चिला जाणार नसला तरी तो भारत आणि चीन यांच्यातील बैठकीत मांडला गेला आहे.
अध्यक्षस्थान राजनाथसिंगांकडे
ही परिषद भारतात होत असल्याने तिचे अध्यक्षस्थान संरक्षणमंप्ती राजनाथसिंग यांच्याकडे आहे. विविध देशांशी संरक्षणविषयक आणि सामरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारताला या परिषदेची आवश्यकता आहे. विभागीय शांतता राखणे, सदस्य देशांचे परस्परांना उत्कट सहकार्य आणि संघटनेची इतर उद्दिष्टय़े साध्य करण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पर्यावरणाचाही मुद्दा
या परिषदेत केवळ सामरिक मुद्दय़ांवर चर्चा होणार असून पर्यावरण, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे महत्वाचे मुद्देही विचारात घेतले जाणार आहेत. या संघटनेचे सर्व देश जागतिक तापमान वाढीच्या विरोधात सहकार्य करीत आहेत. तसेच वातावरणातून कार्बनचे प्रमाण कमी करण्याच्या जागतिक ध्येयाला संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असे प्रारंभीच स्पष्ट करण्यात आले. यासाठी सदस्य देशांच्या वाहतूक मंत्र्यांची परिषदही आयोजित करण्यात आली आहे.
आर्थिक सहकार्य
ही संघटना सदस्य देशांमधील आर्थिक सहकार्यासाठीही विशेष प्रयत्न करणार आहे. भविष्यात ही संघटना आर्थिकदृष्टय़ा इतर संघटनांच्या तोडीस तोड व्हाही यासाठी विशेष योजना आणल्या जाणार आहेत. सध्या ही संघटना एक महत्वाची जागतिक बहुखंडीय संघटना म्हणून नावारुपाला आली आहे.









