ईएमआयने पेमेंट केल्यास प्रक्रिया शुल्क आकारले जाणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जर तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड असल्यास पुढील महिन्यापासून त्याच्या माध्यमातून खरेदी करणे काहीसे महाग ठरणार आहे. प्रत्येक खरेदीवर 99 रुपये आणि कर स्वतंत्रपणे द्यावा लागणार आहे. हे प्रक्रिया शुलक असणार आहे. सर्वप्रथम एसबीआय क्रेडिट कार्डनेच याची सुरुवात केली आहे.
एसबीआय क्रेडिट कार्डने स्वतःच्या ग्राहकांना ईमेल करत नव्या शुल्काची माहिती दिली आहे. 1 डिसेंबर 2021 पासून सर्व मर्चंट ईएमआयच्या देवाणघेवाणीवर प्रक्रिया शुल्क म्हणून 99 रुपये आणि कर द्यावा लागणार असलयाचे ग्राहकांना कळविण्यात आले आहे.
आतापर्यंत अन्य कुठलीही बँक किंवा कंपनीने क्रेडिट कार्डवर प्रक्रिया शुल्क लागू केलेले नाही. एसबीआयच्या निर्णयानंतर सर्व क्रेडिट कार्ड कंपन्या प्रक्रिया शुल्क आकारणीस सुरुवात करणार असल्याचे मानले जातेय. हे प्रक्रिया शुल्क व्याज आणि अन्य शुल्कांच्या व्यतिरिक्त असणार आहे. हे प्रक्रिया शुल्क सर्व ईएमआयद्वारे होणाऱया खरेदीवर लागू होणार आहे. ही खरेदी दुकानावर केलेली असो किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवर किंवा ऍपवर केली तरी प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयामुळे बाय नाऊ-पे लेटर स्कीमवरही प्रभाव पडू शकतो. ग्राहक अधिक खरेदी याच माध्यमातून करत असतात.
हे प्रक्रिया शुल्क व्याजदेयकानंतर आकारले जाणार आहे. काही प्रकरणांमध्ये व्यापारी अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये सूट देत असतात. ग्राहकांना झिरो कॉस्ट ईएमआय देखील मिळतो. आता या सर्वांसोबतच अशा व्यवहारांवर हे प्रक्रिया शुल्क स्वतंत्रपणे ग्राहकांना भरावे लागणार आहे. जर पेमेंट अयशस्वी ठरले किंवा रद्द झाले तर हे शुल्क परत मिळणार आहे.
एचडीएफसी बँकेची मोठी हिस्सेदारी
आरबीआयच्या आकडेवारीनुसार एचडीएफसी बँकेने सप्टेंबरमध्ये 2.44 लाख क्रेडिट कार्ड जारी केले होते. दुसऱया क्रमांकावर आयसीआयसीआय बँक राहिली, जिने 2.33 लाख कार्ड प्रदान केले. ऍक्सिस बँकेने 2.02 लाख आणि देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने 1.74 लाख क्रेडिट कार्ड्स प्रदान केली होती. सप्टेंबरमध्ये सर्व बँकांनी मिळून एकूण 10.91 लाख क्रेडिट कार्ड्स वितरित केली होती.
दरवर्षी होतेय संख्येत वाढ
एसबीआय कार्डने 2018 मध्ये 16.89 लाख, 2019 मध्ये 20.13 लाख, 2020 मध्ये 22.76 लाख आणि 2021 मध्ये आतापर्यंत 12.74 लाख क्रेडिट कार्ड्स वितरित केली आहेत. क्रेडिट कार्ड सेक्टरमध्ये एचडीएफसी बँकेचा हिस्सा 15 टक्के आहे. एसबीआय कार्डचा हिस्सा 12.6 टक्के आणि आयसीआयसी बँकेचा हिस्सा 11.7 टक्के आहे. ऑक्टोबर महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे खर्चात 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. महिन्याच्या आधारावर प्रत्येक क्रेडिट कार्डवरील खरेदीची सरासरी 12.4 हजार रुपये राहिली.








