आमदार प्रसाद गावकर यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
गोवा विधानसभेसाठी चार मतदारसंघ एसटी (अनुसुचित जमाती करीता) राखीव ठेवावेत अशी मागणी अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी केली असून राज्यातील एसटी संघटनांतर्फे तशा आशयाचे एक निवेदन गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱयांना सादर केले आहे.
गोवा राज्यात 2011 च्या जनगणनेनुसार एसटी लोकसंख्या 12 टक्के आहे. त्या हिशोबाने एसटीसाठी 4 मतदारसंघ राखीव ठेवणे गरजेचे आहे. परंतु सध्या तरी एकही राखीव नाही. सांगे, केपे, प्रियोळ व नुवे हे चार मतदारसंघ राखीव असावेत, असेही त्यांनी निवेदनातून सूचवले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाला ते निवेदन पाठवण्यात आले असून या प्रकरणी आयोगाने त्वरित दखल घेवून कार्यवाही करावी, असे गांवकर यांनी म्हटले आहे. आयोगाने गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यास व न्याय न दिल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येणार असल्याचा इशारा गांवकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. गरज पडल्यास हा प्रश्न आम्ही न्यायासाठी न्यायालयात नेऊ असेही गावकर यांनी स्पष्ट केले.









