केवळ 17 हजार प्रवाशांची नोंद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा परिणाम एसटीच्या प्रवासी संख्येवर दिसून येत आह़े मागील आठवडय़ात 25 हजारापर्यंत गेलेली प्रवासी संख्या आता 17 हजार 662 पर्यंत आली आह़े दरम्यान कामावर हजर झालेले कर्मचारी देखील पुन्हा संपात सहभागी होत असल्याचे समोर आले आह़े तर नव्याने बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱयांची संख्या 32 इतकी झाली आह़े अशी माहिती रत्नागिरी विभागाकडून देण्यात आली आह़े
रत्नागिरी विभागाचा विचार करता 3 हजाराहून अधिक कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत़ यातील 300 हून अधिक जणांचे निलंबन करण्यात आले आह़े आता सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया एसटी विभागाकडून हाती घेण्यात आली आह़े त्यानुसार तब्बल 190 जणांना बडतर्फीची नोटीस एसटी विभागाकडून काढण्यात आली आह़े या नोटीसीला उत्तर न दिल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े
दरम्यान बडतर्फीची कारवाई ही अन्यायकारक असून ती मागे घेण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आह़े तसेच एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे देखील कर्मचाऱयांकडून सांगण्यात येत आह़े यामुळे संपाचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान रत्नागिरी विभागात सोमवारी 700 कर्मचारी हजर असल्याचे सांगण्यात येत आह़े









