मनाई आदेशामुळे स्थगित केल्याची मंगेश तळवणेकर यांची माहिती
ओटवणे /प्रतिनिधी-
एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला पाठींबा देण्यासाठी सावंतवाडीत मंगळवारी ७ डिसेंबर रोजी काढण्यात येणारा जनमोर्चा व जेलभरो आंदोलन मनाई आदेशामुळे स्थगित केल्याची माहिती विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी जिल्हयात १६ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. त्यामुळे या जनमोर्चा व जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस एम कोरे यांनी मंगेश तळवणेकर यांच्याशी चर्चा केली. मंगेश तळवणेकर यांनी यापूर्वी पोलीस प्रशासनास केलेल्या सहकार्याचा श्री कोरे यानी आवर्जून उल्लेख करून मनाई आदेशाचा भंग करून काढण्यात येणारा जनमोर्चा व जेलभरो आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. त्यामुळे हा जन मोर्चा व जेलभरो आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे मंगेश तळवणेकर यांनी स्पष्ट केले असून एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास १६ डिसेंबर नंतर शासनाला जाग आणण्यासाठी शांततेत मोर्चा काढण्याचा इशारा मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.