नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विश्वचषक जेत्या भारतीय संघातील जलद गोलंदाज एस. श्रीशांतने बुधवारी सर्व क्रिकेट प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली. त्याने 27 कसोटी, 53 वनडे व 10 टी-20 सामने खेळत त्यात अनुक्रमे 87, 75 व 7 बळी घेतले. अगदी अलीकडेच मेघालयविरुद्ध रणजी लढतीत त्याने केरळचे प्रतिनिधीत्व केले. त्या लढतीत त्याने 2 बळी घेतले तर केरळचा संघ 166 धावांनी विजयी ठरला होता.
पुढील पिढीतील खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आपण आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीचा समारोप करत आहे, असे श्रीशांतने ट्वीटरवर नमूद केले. 25 ऑक्टोबर 2006 रोजी श्रीलंकेविरुद्ध वनडे लढतीच्या माध्यमातून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. नंतर उद्घाटनाच्या 2007 टी-20 विश्वचषक व 2011 वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघात त्याचा समावेश राहिला होता.









