कुंकळ्ळीतून उमेदवारी देण्यास तयार
प्रतिनिधी/ पणजी
‘आप’चे गोव्यातील नेते एल्विस गोम्स यांना काँग्रेस पक्षाने कुंकळ्ळी मतदारसंघासाठी ऑफर दिल्याने एकच खळबळ माजली आहे. सध्या आप पक्षातील काही मंडळी काँग्रेसच्या संपर्कात आल्याने बरीच खमंग चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात आप या पक्षाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठय़ा हालचाली सुरू केल्या आहेत. अलिकडेच काँग्रेसने एल्विस गोम्स यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना कुंकळ्ळी मतदारसंघात उभे राहण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र एल्विस गोम्स यांनी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. आपचा प्रभाव वाढल्याने काँग्रेस पक्षात गंभीर विचारचक्र चालू आहे. आपमुळे भाजपपेक्षा काँग्रेसचीच मते जास्त जातील याची धास्ती काँग्रेसने घेतली आहे. आपच्या अनेक नेत्यांशी आतापासूनच काँग्रेसने संपर्क ठेवला आहे.
एल्विस गोम्स हे मागील निवडणुकीत आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. कुंकळ्ळीत जरी त्यांचा मोठय़ा फरकाने पराभव झालेला असला तरी त्यांनी सुमारे 3500 मते घेतलेली होती. एल्विस गोम्स यांच्या स्वच्छ प्रतिमा व आपचा वाढता प्रभाव यामुळे काँग्रेसने आपचा धावणारा घोडा तिथल्या तिथे रोखून ठेवण्यासाठी एल्विस गोम्स यांच्याभोवती कडे केले आहे. राज्यात सध्या सर्वत्र एल्विस गोम्स हे काँग्रेस पक्षात जाणार व कुंकळ्ळीचे ते काँग्रेस उमेदवार असतील असा होरा बांधला जात आहे.
अद्याप कोणताही निर्णय नाही : एल्विस गोम्स
एल्विस गोम्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आपल्याला अनेक पक्षांच्या ऑफर्स आलेल्या आहेत. काँग्रेसने तर कधीपासूनच प्रस्ताव दिलेला आहे. मात्र आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला.
एल्विस गोम्स यांच्यावर आपची भिस्त
आपमध्ये सध्या नाराज असलेल्या एल्विस गोम्स यांच्यावर आपची भिस्त आहे आणि काँग्रेस पक्षाला देखील स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार कुंकळ्ळीला हवा आहे. तथापि, गोम्स यांनी जरी कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी आपशी त्यांचे ताणलेले संबंध हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा विषय ठरला आहे. आपची हवा काढून घेण्यासाठी काँग्रेस पक्ष टपकून आहे.
काँग्रेसच्या आमदारावर आपची नजर
या साऱया परिस्थितीचा विचार करता एल्विस गोम्स यांना पक्षातून बाहेर पडू नये याकरिता आपला फार मोठा आटापिटा करावा लागणार आहे. आपनेही काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेसच्या दक्षिणेतील एका आमदारावर आपची दृष्टी आहे. त्यातून आपमध्ये गृहकलह सुरू झाला आहे.









