वृत्तसंस्था/ केपटाऊन
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱया सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱया दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 3 बाद 153 धावा जमविल्या. एल्गार आणि डय़ुसेन यांच्या अर्धशतकांमुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव 269 धावांवर आटोपला.
इंग्लंडने 9 बाद 262 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. त्यांच्या शेवटच्या जोडीने आणखी 7 धावांची भर घातली. रेबाडाने अँडरसनला 4 धावांवर बाद केले. इंग्लंडचा पहिला डाव 91.5 षटकांत 269 धावांत आटोपला. इंग्लंडच्या पहिल्या डावात पोपने 7 चौकारांसह 61, स्टोक्सने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 47, डिनेलीने 5 चौकारांसह 38, कर्णधार रूटने 5 चौकारांसह 35, सिबेलीने 7 चौकारांसह 34, बटलरने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे रेबाडाने 3, फिलँडर, नॉर्जे, प्रेटोरियस यांनी प्रत्येकी 2 आणि केशव महाराजने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. स्टुअर्ट ब्रॉड आणि अँडरसन यांच्या भेदक माऱयासमोर दक्षिण आफ्रिकेची एकवेळ स्थिती 3 बाद 40 अशी केविलवाणी झाली होती. सलामीचा मॅलेन 5, हमझा 5 आणि कर्णधार डु प्लेसिस एका धावेवर बाद झाले. त्यानंतर एल्गार आणि डय़ुसेन यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 113 धावांची भागिदारी केली होती. एल्गार 10 चौकारांसह 85 तर डय़ुसेन 5 चौकारांसह 50 धावांवर खेळत आहे. इंग्लंडतर्फे ब्रॉडने 2 तर अँडरसनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव- 91,5 षटकांत सर्वबाद 269 (पोप नाबाद 61, स्टोक्स 47, डिनेली 38, रूट 35, सिबेली 34, बटलर 29, रेबाडा 3 बळी, फिलँडर, नॉर्जे, प्रेटोरियस प्रत्येकी 2 बळी, केशव महाराज 1 बळी), दक्षिण आफ्रिका प. डाव- 59 षटकांत 3 बाद 153 (एल्गार खेळत आहे 85, डय़ुसेन खेळत आहे. 50, मॅलेन 5, हमझा 5, डु प्लेसिस 1, ब्रॉड 2-31, अँडरसन 1-28).









