मागील आठवडय़ात समभागात मजबूत स्थितीचा फायदा
नवी दिल्ली
जगातील दिग्गज कार निर्मिती करणारी कंपनी टेस्ला आणि यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यावेळी श्रीमंताच्या यादीत दररोज नवा विक्रम करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये एक आठवडय़ापासून मस्क यांची संपत्ती वेगाने वाढत आहे. सोमवारी यांची संपत्ती साधारणपणे 311 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. भारत आणि आशियातील सर्वात धनाढय़ व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची ओळख असून अंबानींच्या तुलनेत मस्क हे तीनपटीने श्रीमंत बनले आहेत.
भारतीय शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे बाजार मूल्य साधारणपणे 3.5ट्रिलियन डॉलर आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार टेस्ला आणि रॉकेट कंपनी स्पेस-एक्सचे सह संस्थापक मस्क यांनी चालू वर्षात आपल्या संपत्तीत 122.3 अब्ज डॉलरने वाढ केली आहे. यातून एकूण संपत्ती 292 अब्ज डॉलरची झाली आहे.
टेस्लाच्या समभागांची स्थिती
टेस्ला कंपनीचे समभाग मागील आठवडय़ापासून सलगपणे वधारत असून यामध्ये आताच्या घडीला मस्क यांची संपत्ती 9 अब्ज डॉलरने वाढली आहे. फक्त यामध्ये अंबानींनाच मागे न टाकता ते जगातील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेपेक्षाही तीनपट अधिक श्रीमंत झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
वॉरेन बफे यांची संपत्ती105 अब्ज डॉलरवर
वॉरेन बफे यांची संपत्ती सोमवारी 105 अब्ज डॉलर होती. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 95.8 अब्ज डॉलरवर राहिली होती. बफे आणि अंबानी हे श्रीमंतांच्या यादीत 10 व 11 व्या नंबरवर आहेत.
भारतीय रस्त्यांवर धावणार कार
टेस्लाने प्रथमच भारतीय रस्त्यांवर आपली कार उतरविण्याची तयारी केली आहे. यामध्ये भारत सरकार काही प्रमाणात सवलत देण्याचे संकेत आहेत. इलेक्ट्रॉनिक कार्सकरीता सरकारने प्रोत्साहनात्मक योजना तयार केली आहे. याचाही लाभ टेस्लाला होणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.









