बिम्सच्या आवारात आजपासून काम सुरू : 15 दिवसात काम पूर्ण करून ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी
प्रतिनिधी / बेळगाव
ऑक्सिजनअभावी कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या नेतृत्वाखाली बिम्स इस्पितळाच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. सदर ऑक्सिजन उत्पादन प्लांट उभारण्याची तयारी एल ऍण्ड टी कंपनीने तयारी दर्शविल्याने सदर कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले. त्यामुळे बिम्स रुग्णालय आवारात बुधवारपासून ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
सध्या कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन जीवदान ठरत आहे. पण ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने कोरोनाबाधित मृत्युमुखी पडत आहेत. शहरात ऑक्सिजनअभावी असंख्य रुग्णांचा बळी गेला आहे. खाजगी आणि सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळणे अवघड बनले आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने देखील पावले उचललेली आहेत. सध्या केंद्र शासनाने रेल्वेद्वारे ऑक्सिजन पुरवठा चालविला आहे. तसेच अन्य राष्ट्रांनी देखील ऑक्सिजनचे कंटेनर देवू केले आहेत. पण देशभरात कोरोनाचा उदेक झाल्याने सर्वत्र ऑक्सिजन उपलब्ध करणे अडचणीचे ठरत आहे. त्या अडचणीवर मात करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सदर प्रस्ताव कोविड कमिटीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. सदर प्लांट निर्माण करण्यासाठी कोविड नियंत्रण कमिटीने ग्रीन सिग्नल दिला आहे.
सदर प्लांट उभारण्यासाठी एल ऍण्ड टी कंपनी पुढे आली आहे. सदर प्लांटच्या उभारणीकरिता कंपनीला गुंतवणूक करावी लागणार आहे.
सदर गुंतवणूक करून पंधरा दिवसात प्लांटचे काम पूर्ण करून ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी एलऍण्डटी कंपनीने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे कोविड नियंत्रण कमिटी व जिल्हा प्रशासनाने एलऍण्डटी कपंनीला काम देण्यास मंजुरी दिली आहे. तसेच हा प्रकल्प उभारणीकरिता राज्य शासनानेदेखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाचे कंत्राट एलऍण्डटी कंपनीला मंजूर करण्यात आले आहे.
सध्या सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी दररोज 13 के एलडी ऑक्सिजनची गरज आहे. त्यादृष्टीने प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 750 प्रतिलिटर प्रति मिनिट ऑक्सिजन तयार करण्याच्या क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प उभारण्यासाठी पंधरा दिवसाचा अवधी लागणार आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून ऑक्सिजनच्या तुटवडय़ावर मात करण्यासाठी हा प्रस्ताव लवकर मार्गी लावण्यासाठी प्रकल्प उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे बिम्स आवारात ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाच्या कामाला बुधवारपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.









