नववर्षाच्या तीन दिवसातच घेतला सावध पवित्रा
वृत्तसंस्था/ मुंबई
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी (एफपीआय) नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय बाजारातून माघार घेतली आहे. एफपीआयने जानेवारीच्या पहिल्या तीन व्यापारी सत्रांमध्ये भारतीय बाजारातून 2418 कोटी रुपये काढून घेतले आहेत. एक ते तीन जानेवारीच्या दरम्यान एफपीआयने समभागातून 524.91 कोटी तर बाजारपेठेतून 1893.66 कोटी रुपये परत घेतले आहेत.
एफपीआयने 2019 मध्ये स्थानिक बाजारात 73276.63 कोटी रुपये गुंतविले होते. जानेवारी, जुलै आणि ऑगस्ट सोडून गतवर्षीच्या इतर महिन्यांमध्ये एफपीआयने खरेदी केली होती. गेल्या वर्षीच्या जोरदार तेजीनंतर एफपीआयने 2020 मध्ये नफाकमाई सुरू केली आहे. आता ते पैसे काढून घेत रक्कम जमा ठेवून अर्थसंकल्पाच्या अगोदर मोठय़ाप्रमाणात खरेदी करतील, असे सॅम्को सिक्युरिटीजचे उमेश मेहता यांनी सांगितले आहे.
विदेशी गुंतवणूकदार सतर्कतेत आहेत. एफपीआयच्या नकारात्मक भूमिकेच्या मागे काही कारणे असून, भारतातील राजकीय स्थिती, अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीचाही परिणामही प्रखरपणे होत असल्याचे मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट ऍडव्हायझर इंडियाचे हिमांशु श्रीवास्ताव यांनी म्हटले आहे.








