एप्रिल ते जून दरम्यान 10-15 इश्यू येण्याचे संकेत- या महिन्यात 5 ते 6 आयपीओ
वृत्तसंस्था / मुंबई
नियमीत गुंतवणूकदारांसाठी आणि तिमाही गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची संधी चालून येणार असल्याचे संकेत आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 10 ते 15 कंपन्यांचे आयपीओ भारतीय भांडवली बाजारात येण्याचे संकेत आहेत. 7 एप्रिलपासून याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्स 2,500 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ सादर करणार आहे.
मॅक्रोटेक डेव्हलपर्सला आधी लोढा डेव्हलपर्स या नावानेही ओळखले जात असायचे. इश्यु 7 एप्रिलला खुला होणार असून गुंतवणूकदारांना 9 एप्रिलपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. कंपनी मुख्य गुंतवणूकदारांच्या मदतीने ही रक्कम उभारणार आहे. फक्त एप्रिलमध्ये 5 ते 6 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. यामध्ये डोल्डा डेअरी, कृष्णा इन्स्टिटय़ूशन ऑफ मेडिकल सायन्स (केआयएमएस) हॉस्पिटल्स, इंडिया पेस्टिसाइड्स, सोना कॉमस्टार आणि आधार हाऊसिंग फायनान्स कंपनीचा समावेश आहे.
शेअर बाजारातील तेजी
तज्ञांच्या माहितीनुसार शेअर बाजारात तेजीचा कल हा सुरु राहणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये आर्थिक वर्षात स्मॉलकॅप आणि मिडकॅप क्षेत्रातील समभागात मजबूत तेजी राहण्याचे संकेत आहेत. यात प्रायमरी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांकडून पब्लिक इश्यूंना चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज आहे. या कामगिरीतून कंपन्या आयपीओच्या मदतीने जवळपास 26 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एलआयसीचा आयपीओ
चालू आर्थिक वर्षात आयपीओंचा धमाका मजबूत राहणार असल्याचा अंदाज आहे. सरकारी क्षेत्रातील भारतीय जीवन विमा निगमचा इश्यू येणार आहे. यामुळे जवळपास 80 हजार कोटी रुपये आयपीओअंतर्गत प्राप्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अन्य कंपन्यांचेही आयपीओ
बजाज एनर्जी, नायका, श्याम स्टील यासारख्या नावांचा समावेश होणार असून यांचेही आर्थिक वर्षात आयपीओ सादर होणार असल्याची माहिती आहे.








