वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळय़ांची मागणी वाढली आहे. याचा परिणाम रताळी दरात 200 रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती रताळी व्यापारी मोहन कुटे यांनी दिली.
बाजारात चांगल्या प्रतीची रताळी 1100 ते 1300 रुपये अशी झाली तर सर्वसाधारण रताळी 700 ते 1000 रुपये दराने विकली गेली. बाजारात 10 हजार पोती रताळी आवक झाली होती.
बुधवारी कांदा दरात 300 रुपये वाढ झाली. स्थानिक जवारी बटाटा बियाणासाठी वापरात येणारा त्याचा भाव 200 रुपयांनी वधारला तर खायचा चांगल्या प्रतीचा गोळा बटाटा 700 रुपयांनी कमी झाला. शिवाय परराज्यातील बटाटा 200 ते 300 रुपयांनी कमी झाला.
40 ट्रक कांदा आवक
बाजारात कांदा आवक 40 ट्रक इतकी होती तर मागील बाजारी 70 ट्रक इतकी आवक झाली होती. मागील बाजारपेक्षा 30 ट्रक कांदा आवक कमी झाली. याचा परिणाम कांदा दरात वाढ झाली असल्याची माहिती कांदा व्यापारी सिद्धार्थ नरेगावी यांनी दिली.
बाजारातील कांदा आवक ही महाराष्ट्रातील व्यापाऱयांची होती तर तुरळक प्रमाणात कांदा आवक कर्नाटकातील होती. बाजारात जुना कांदा 10 ट्रक इतका होता. त्याचा भाव 2200 ते 2500 रुपये असा झाला. बटाटा बाजारात परराज्यातील बटाटा आवक 21 ट्रक इतकी होती. यामध्ये महाराष्ट्रातील तळेगावचा बटाटा 15 ट्रक, इंदूर 1, आग्रा 3, गुजरात 2 ट्रक इतकी बटाटा आवक होती. बाजारात इंदूर, तळेगावचा बटाटा 200 रुपयांनी तर आग्रा बटाटा 300 रुपयांनी कमी झाल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली.
बाजारातील स्थानिक बटाटा आवक तुरळक प्रमाणात होत आहे. बाजारातील बटाटा आवक जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. बियाणासाठी वापरात येणारा बटाटा कमी येत असल्याने त्याचा भाव वधारला असल्याची माहिती व्यापारी प्रकाश पाटील यांनी दिली.









