कोल्हापूर / प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील सर यांचे आज दु:खद निधन झाले. यांच्या निधनामुळे राज्यातल्या तमाम शेतकरी व कष्टकर्यांची चळवळ पोरकी झाली आहे. हा फार मोठा धक्का असून सामाजिक व शेतकरी चळवळीत काम करणारऱ्या कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला आहे. आम्हा सर्वांचे ते भीष्माचार्य होते. एक चालतं बोलतं विद्यापीठ आमच्यातून निघून गेलं आहे. सर्व प्रकारच्या आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. एस. ई. झेड, वीज प्रश्न, कोल्हापूर टोल नाका, सीमाप्रश्न, ऊस आंदोलन, इरिगेशन फेडरेशनच्या माध्यमातून शेतीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आदी सर्व सामाजिक प्रश्नांच्या आंदोलनामध्ये ते नेहमीच अग्रभागी राहिले. रस्त्यावर उतरून सत्ताधारी सरकारवर आसूड ओढून अनेक आंदोलनात सहभागी राहिले. शेतकरी चळवळीला त्यांचं नेहमीच मोलाचं मार्गदर्शन लाभले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिले. राजाराम कारखाना हा खासगी कारखाना होता. ते सहकारमंत्री असताना खासगी असलेला साखर कारखान्याचा सहकारी कारखान्यामध्ये रूपांतर करण्यात आला. सहकार चळवळीला दिलासा देणारी अशी घटना होती.
काही दिवसापुर्वी शरीर साथ देत नसल्याने अंथरूणावर असलेले चळवळीतील भीष्माचार्य एन. डी. पाटील (दाजी) यांची कोल्हापूरातील निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. शेतकरी चळवळीबद्दल अंतःकरणातून असलेली तळमळ व निष्ठेने करत असलेल्या आंदोलनाची धग ती मनामध्ये कायमची टिकून होती. त्यांची व माझी ती शेवटची भेट ठरली. माझ्यासारख्या चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्याला “भान ठेवून नियोजन करावं आणि बेभान होऊन कार्यवाही करावी” यापद्धतीचं एन. डी. साहेबांचं काम मी १९८० पासून जवळून पाहत आलो व यामुळेच माझ्या शेतकरी चळवळीला दिशा मिळत गेली. चळवळीतील तारूण्यातील कार्यकर्ता, यशस्वी लोकप्रतिनिधी ते राज्याच्या शेतकरी चळवळीतील भीष्माचार्य असा एन. डी. साहेबांचा प्रवास माझ्या सारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा होता.
चळवळीतले भीष्माचार्य आज आम्हाला सोडून गेले. त्यांनी मळवलेल्या पाय वाटेवर चालत राहणे, हीच माझ्या सारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची श्रध्दांजली ठरेल.