कामदेवाच्या अमोघ पराक्रमाचे स्मरण प्रद्युम्नाला करून देताना मायावतीने पुढे विष्णु, भरद्वाज महामुनी, मैत्रावरुण ऋषि, विभाण्ड ऋषि यांच्यावर कामदेवाने कसा विजय मिळविला याची उदाहरणे दिली व ती पुढे म्हणाली-प्रद्युम्ना! अरे अशा एकापेक्षा एक श्रे÷ देवतांना, बलाढय़ दैत्यांना आणि महातपस्वी मुनींना तू आपल्या प्रभावाने जिंकले आहेस तर या यत्किंचित शंबरासूराचा तुझ्यापुढे काय पाड लागणार मोहनादि अस्त्रांमध्ये तू प्रवीण आहेस. आपल्या अमोघ शस्त्र व अस्त्रांचा वापर करून या शंबरासूराचा वध कर व मला तुझ्या आई वडिलांना भेटायला द्वारकेला घेऊन जा.
कृष्णदयार्णवांनी या ठिकाणी कामदेवाच्या पराक्रमाचे वर्णन करताना जी अत्यंत श्रे÷ देवता व महातपस्वी ऋषिंची उदाहरणे दिली आहेत, ती वाचताना आपण अंतर्मुख होऊन मनोमन चिंतन करायला हवे. काम ही मनाची अत्यंत प्रबळ भावना आहे. जोपर्यंत आपला काम हा धर्माच्या बंधनात आहे, विवेकाची मर्यादा पाळत आहे तोपर्यंत तो उपयुक्त आहे. वंशसातत्य टिकविण्यासाठी कामाची आवश्यकता आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीत त्याला त्याज्य न मानता पुरुषार्थ मानले आहे. परंतु अनिर्बंध काम हा मनोविकार आहे. तो आपले जीवनच उद्ध्वस्त करणारा शत्रू बनू शकतो. काम आपल्या नियंत्रणात असेल तर आपला मित्र नाहीतर आपला शत्रू बनेल. भल्लाभल्यांना या कामाने लोळवले आहे, पराभूत केले आहे.
एकनाथ महाराजांनी एडका या आपल्या भारुडात हाच विचार मांडलेला आहे.
ते भारुड असे- एडका मदन, तो केवळ पंचानन।धडक मारिली शंकरा। केला ब्रह्मयाचा मातेरा । इंद्र चंद्रासी दरारा। लाविला जेणे । तो केवळ पंचानन। धडक मारिली नारदा। केला रावणाचा चेंदा। दुर्योधना मारिली गदा। घेतला प्राण । तो केवळ पंचानन।भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गति झाली वालीसी। विश्व्ा्रामित्रा सारिखा ऋषी। नाडीला जेणे। तो केवळ पंचानन।शुक देवाने ध्यान धरोनी ।एडका आणिला आकळोनी। एका जनार्दनाचे चरणी । बांधिला जेणे । तो केवळ पंचानन । एडका म्हणजे मेंढा! पण हा मदन म्हणजेच कामरूपी एडका सामान्य नाही. एकनाथ महाराजांनी या एडक्मयाला पंचानन असेही म्हटले आहे, ते का? पंचानन म्हणजे सिंह! सिंह हा ज्याप्रमाणे जंगलाचा राजा आहे त्या प्रमाणे कामरुपी एडका हा सर्व मनोविकारांचा राजा आहे. या एडक्मयाने कुणाकुणाला धडक मारली आणि पराभूत केले याची यादीच एकनाथ महाराज पुढे देतात. देवाधिदेव शंकर, सृष्टीकर्ता ब्रह्मदेव, निशापती चंद्र, देवांचा राजा इंद्र, देवषी नारद, महापराक्रमी दैत्यराज रावण, बलाढय़ दुर्योधन, शिवभक्त दैत्य भस्मासूर, महाबलाढय़ वानरराज वाली, अत्यंत तपस्वी विश्वामित्र महामुनी यांना या कामविकाराने त्रस्त केले, पराभूत केले. पण व्यासपुत्र शुकदेवांनी मात्र ध्यान धरून, चिंतन करून, विवेकाने कामविकाराला बंदी बनवले आणि एका जनार्दनाच्या चरणी आणून बांधले, असे नाथबाबा सांगतात.








