नेहरूनगर वीज कार्यालयाला चोरटय़ांचा झटका
प्रतिनिधी/ बेळगाव
नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयाच्या आवारात वीजबिले भरण्यासाठी असलेले एटीपी मशीन फोडून दोन लाख रुपये लांबविण्यात आले आहेत. रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.
यासंबंधी सुरेश मगदूम यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या ठशांचे नमुने ताब्यात घेतले असून त्यावरून गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.
नेहरूनगर येथे हेस्कॉम कार्यालय आवारातच ही एटीपी मशीन आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत येथे वीजबिले भरली जातात. शनिवारी 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता दिवसभर जमलेले 1 लाख 92 हजार 210 रुपये रक्कम मशीनमध्येच ठेवून कर्मचाऱयांनी त्याला कुलूप लावले होते.
रविवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कर्मचारी पोहोचला, त्यावेळी चोरटय़ांनी मशीन फोडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तातडीने माळमारुती पोलिसांना पाचारण करण्यात आले. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयात चोरटय़ांची छबी कैद झाली आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









