ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड विद्यापीठात सध्या कोरोनाची लस विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विद्यापीठाने लसीचा एक नमुना तयार केला आहे. मात्र, त्याच्या मानवावरील प्रयोगावरून एक विचित्र प्रकार आढळून आल्याने सध्या हे प्रयोग बंद ठेवण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर ही लस टोचून घेतलेल्या अनेक स्वयंसेवकांमध्ये एचआयव्हीची प्रतिजैविके निर्माण झाली आहेत. संशोधकांसाठी हा आश्चर्यकारक प्रकार असून त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रयोग थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
क्विन्सलँड विद्यापीठात तयार झालेली ही लस इतर बाबतीत अत्यंत सुरक्षित आणि दुष्परिणामविहीन अशी आहे. आतापर्यंत 216 स्वयंसेवकांना ती पहिल्या टप्प्यातील चाचणींतर्गत टोचण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 20 टक्के स्वयंसेवकांमध्ये एचआयव्ही प्रतिजैविके तयार झाल्याचे दिसून आले. हा प्रकार कसा घडला? यावर सखोल संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणू आणि एचआयव्ही विषाणू यांच्यात काही साधर्म्य आहे का? तसेच असल्यास ते किती प्रमाणात आहे? हे तपासले जात आहे.
इतर लसींसाठीही उपयुक्त
जगात किमान 30 देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. क्विन्सलँडमधील प्रयोगातून जे अनुभवायस आले त्याची कारणे समजल्यास ती इतर लस निर्मात्यांनाही उपयुक्त ठरतील. एचआयव्ही या विषाणूमधील जीपी-41 हे महत्त्वाचे प्रथिन काही स्वयंसेवकांच्या रक्तात निर्माण झाल्याचे संशोधकांच्या लक्षात आले असून त्याची कारणे शोधण्यावर आता भर दिला जात आहे.
कायद्याचा प्रश्न
एचआयव्ही विषाणूसंदर्भात ऑस्ट्रेलियातील कायदे कठोर आहेत. त्यामुळे या लसीचा जो परिणाम काही स्वयंसेवकांवर दिसून आला त्यासंबंधी संशोधकांनी ऑस्ट्रेलियाच्या सरकारशी चर्चा केल्यानंतर प्रयोग थांबविण्यात आले. मात्र, सुरक्षित पद्धतीने हे प्रयोग पुन्हा सुरू होणार आहेत.









