सर्व गावांमध्ये होणार कोरोना चाचणी : जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता प्रत्येक गावात रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहे. सोमवारी एकाच वेळी 135 गावांमध्ये तपासणीला चालना देण्यात आली. बाधितांचा त्वरित शोध घेऊन फैलाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
हुक्केरी तालुक्मयातील हुल्लोळी व हत्तरगी येथे सोमवारी कोरोना चाचणीला चालना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, प्रत्येक गावात तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी एकाच वेळी 135 गावांमध्ये रॅपिड तपासणी करण्यात आली. उर्वरित गावांमध्येही ही तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावात एका नोडल अधिकाऱयाची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात सक्रिय असलेल्या टास्कफोर्सच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
चाचणीसह अहवाल येण्याला विलंब होत असल्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने वाढतो आहे. त्याला आवर घालण्यासाठी प्रत्येक गावात कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. ज्यांना लक्षणे आहेत व जे बाधित आहेत त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची त्यांच्या गावातच तपासणी करण्यात येत आहे. जर अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.
तालुका पातळीवर विशेष केंदे सुरू
आरोग्य विभागाचे पथक गावात आल्यानंतर ज्यांना ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आहेत अशा नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपली तपासणी करून घ्यावी. रॅपिड तपासणी पॉझिटिव्ह आल्यास कोणीही घाबरून जाऊ नये. बाधितांवर उपचार करण्यासाठी स्थानिक पातळीवर व तालुका पातळीवर विशेष केंदे सुरू करण्यात आली आहेत. बाधितांना मोफत जेवण पुरविण्याबरोबरच सरकारच्या मार्गसूचीनुसार त्यांना औषधे देण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
हुल्लोळी येथे 39 जणांची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट
हुक्केरी तालुक्मयातील हुल्लोळी येथे 39 जणांची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी दोघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. उर्वरित 37 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर तपासणीसाठी त्यांचे स्वॅब पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
कोरोना तपासणीला चालना दिल्यानंतर हुल्लोळी येथे घरोघरी जाऊन जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाविषयी जागृती केली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली. जनता कॉलनीत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या काही कुटुंबांची भेट घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी त्यांच्याशीही चर्चा केली. कोणी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये. प्रत्येकांनी मास्क परिधान करावे. साबण व सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ धुवून घ्यावे, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले.
चेकपोस्टची पाहणी
उळ्ळागड्डी खानापूर येथे स्थापन करण्यात आलेल्या चेकपोस्टला भेट देऊन जिल्हाधिकाऱयांनी पाहणी केली. हत्तरगी येथेही कोरोना थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन रॅपिड ऍन्टिजेन टेस्टला चालना देण्यात आली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. व्ही. दर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगल तालुक्मयात तपासणीला सुरुवात करण्यात आली.









