गोकाक तालुक्यातील ममदापूर क्रॉसनजीक भीषण अपघात
प्रतिनिधी / बेळगाव
कारने टाटा एस वाहनाला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षाच्या बालिकेसह एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले आहेत. तर टाटा एस चालकासह चार जण जखमी झाले आहेत. सदर घटना रविवार 15 रोजी सायंकाळी गोकाक तालुक्यातील ममदापूर क्रॉसनजीक घडली. सिद्दव्वा फकिराप्पा परकनहट्टी (वय 50), हणमंत फकिराप्पा परकनहट्टी (वय 28), मालव्वा हणमंत परकनहट्टी (वय 25), किर्ती हणमंत परकनहट्टी (वय 6, सर्व रा. मुगळीहाळ, ता. सौंदत्ती) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. ऐन पाडव्याच्या मुहूर्तावर परकनहट्टी कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत समजलेली माहिती, हणमंत परकनहट्टी हे रविवारी आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी कारने कोल्हापूरहून सौंदत्ती तालुक्यातील मुगळीहाळ येथे जात होते. दरम्यान, त्यांची कार ममदापूर क्रॉसनजीक आली असता चालक हणमंत याचा कारवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱया टाटा एसला जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत सहा वर्षाच्या बालिकेसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह चार जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी पाठवून दिले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर गोकाक सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद गोकाक ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









