पोलीस स्थानक, शाळेसह सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध
अमेरिकेच्या अलास्का प्रांतातील एका शहराची लोकसंख्या केवळ 200 इतकी आहे. व्हिट्टियर नावाच्या या शहरातील सर्व लोक एका 14 मजली इमारतीत राहतात. या इमारतीचे नाव बेगिच टॉवर आहे. इमारतीच्या मालकापासून पोलीस कर्मचारी आणि शासकीय अधिकारी देखील सर्व लोकांसोबत याच इमारतीत राहतात.
शहराच्या छोटय़ाशा लोकसंख्येकडे सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. पोलीस स्थानकापासून किराणा दुकान, चर्च आणि शाळा देखील उपलब्ध आहे. शाळेत जाण्यासाठी पश्चिमेकडील टॉवरच्या तळमजल्यावर तयार करण्यात आलेल्या भुयाराचा वापर करण्यात येतो. याच्या अद्भूत डिझाइनमुळे हिवाळय़ातही मुले अत्यंत सहजपणे शाळेत जाऊ शकतात. एकाच इमारतीत सर्व सुविधा उपलब्ध असण्यामागचे कारण म्हणजे या इमारतीला सैन्य छावणीच्या स्वरुपात वापरले जात होते.
हवामानाचा भरवसा नाही
या इमारतीची निर्मिती दुसरे महायुद्धानंतर करण्यात आली होती. अलास्काच्या हवामानाचा भरवसा ठेवता येत नाही. तेथे 60 मैल प्रतितासाच्या वेगाने वाहणारे वारे घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना नुकसान पोहोचवितात. 250 ते 400 इंचापर्यंत हिमवृष्टीची नोंद होते. काही काळासाठी स्थानिक लोक स्वतःच्या घरातच कैद होतात. याचमुळे पूर्ण शहर एकाच इमारतीत सर्व सुविधांसह वास्तव्य करून आहे.
परस्परांच्या मदतीला तयार
छोटी लोकसंख्या असल्याने इमारतीत राहणारे बहुतांश लोक परस्परांना ओळखतात. हे लोक कामावर जाताना किंवा घरी परतताना परस्परांना पाहत असतात. विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत घेणे खूपच सोपे आहे. पोलिसांकडून मदत मिळावी म्हणून लोकांनाही सहजपणे संपर्क करता येतो. एकाच घरात राहत असल्याने हे लोक परस्परांच्या मदतीसाठी तयार असतात.









