राजदचा प्रस्ताव : तेजस्वींना मुख्यमंत्री करा : पंतप्रधानपदासाठी नितीश यांना समर्थन देऊ
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारमध्ये भाजप आणि संजद यांच्यात सुरू असलेल्या सत्तेच्या चढाओढीदम्यान राजदने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना नवा प्रस्ताव दिला आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन दिल्यास विरोधी पक्ष नितीश कुमार यांना 2024 मध्ये पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार असल्याचे राजदचे वरिष्ठ नेते उदयनारायण चौधरी यांनी मंगळवारी म्हटले आहे. हा प्रस्ताव मांडून राजदने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
नितीश यांच्या नेतृत्वाखाली भाजपला केंद्रात रोखण्याचा आणि बिहारमध्ये सत्ता प्राप्त करण्याचा राजदने याद्वारे प्रयत्न चालविला आहे. बिहारमध्ये मध्यावधी निवडणूक होणार असल्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी यापूर्वीच म्हटले आहे. तर भाजपकडून होत असलेल्या फजितीनंतर नितीश यांनी राजीनामा द्यावा, असे विधान काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंग यांनी केले आहे. अरुणाचल प्रदेशात संजदच्या 6 आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर भाजप आणि संजदमध्ये काही प्रमाणात राजकीय अंतर दिसू लागले आहे.
भाजपची महत्त्वाकांक्षा
राज्यात संजदपेक्षा अधिक जागा मिळविणाऱया भाजपची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. भाजपने यापूर्वीच विधान परिषदेचे सभापतीपद आणि विधानसभेचे अध्यक्षपद प्राप्त केले आहे. तर भाजपच्या एका नेत्याने नितीश यांनी गृहविभाग सोडावे अशी मागणी केली आहे. विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजप अधिक बळकट तर संजद कमकुवत झाला आहे. विधानसभेच्या 243 जागांपैकी भाजप 74 तर संजदने 43 जागा जिंकल्या आहेत. भाजपने निवडणूकपूर्व आश्वासनानुसार नितीश यांनाच मुख्यमंत्रिपद दिले आहे.
एकेकाळी पंतप्रधानपदाचे दावेदार
नितीश कुमार यांना 2014 मध्ये पंतप्रधानपदाचा मोठा दावेदार मानले जात होते, परंतु नरेंद्र मोदींनी या शर्यतीत त्यांच्यावर मात केली होती. अरुणाचल प्रदेशात भाजपने संजदच्या 6 आमदारांना स्वतःच्या पक्षात घेतले होते. या पार्श्वभूमीवर संजदने अन्य राज्यांमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. तर आपण मुख्यमंत्री होऊ इच्छित नव्हतो, परंतु भाजपच्या आग्रहामुळे ही जबाबदारी स्वीकारल्याचे नितीश यांनी म्हटले होते. बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. याचे खापर नितीश यांनी भाजपवरच फोडले आहे.









