म्हापसा हॉस्पिटलात रुग्णांची स्वतः केली तपासणी : जुन्या आठवणींना दिला उजाळा : वाढदिवस डॉक्टरांच्या सेवेला समर्पित
प्रतिनिधी / म्हापसा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी आपल्या वाढदिनी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात तब्बल 12 वर्षाच्या कालावधीनंतर डॉक्टरी सेवा बजावून आपला वाढदिवस डॉक्टारांना समर्पित केला. त्यांनी 10 आयुर्वेदिक रुग्णांची तपासणी केली. देशभरात कोरोना या महाभयंकर रोगाच्या काळात डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारीवर्ग दिवसरात्र सेवा देत आहेत. असे असतानाही देशात काही ठिकाणी डॉक्टर्सवर हल्ले होत आहेत, त्याचा निषेध मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिनी डॉक्टरी सेवा बजावून केला.
म्हापसा जिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. मोहनदास पेडणेकर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी इस्पितळाची संपूर्ण फिरून पाहणी केली. कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबोही उपस्थित होते. पाहणी केल्यावर येथील कामाबद्दल मुख्यमत्र्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी पेडणेकर यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली.
एक तपानंतर म्हापसा आझिलोत सेवा बजावली
इस्पितळामध्ये पाहणी केल्यावर मुख्यमंत्री आयुर्वेदिक ओपीडीमध्ये येऊन बसले. आयुर्वेदिक डॉ. समीर सडेकर यांच्याशी बातचित करून आज आपला वाढदिवस असल्याने आपण खूप वर्षानंतर या इस्पितळात रुग्णांची तपासणी करतो असे सांगून त्यांनी तब्बल दहा रुग्णांची तपासणी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, 2008 साली आपण या इस्पितळामध्ये डॉक्टर म्हणून काम करीत होतो. आज तब्बल एका तपानंतर आपण या इस्पितळात वाढदिवसाचे औचित्य साधून पोचलो. पूर्वीचे दिवस, आठवणी आपल्याला खूप काही सांगून गेल्या…
आज देशभरात कोरोना रोगाची लागण होत असतानाच डॉक्टर तसेच वैद्यकीय सेवा बजावणाऱयांवर हल्ले होत आहेत. आपल्या राज्यात तशी परिस्थिती नाही. गोव्याचे नागरिक समजूतदार आहेत. आपण वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले होते. मात्र येथे सेवा बजावून आपला वाढदिवस आपण ज्यांच्यावर हल्ले झाले व जे आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत त्या डॉक्टरांना समर्पित करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वाच्या प्रयत्नांमुळे राज्य कोरोनामुक्त
राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी धडपडणारे डॉक्टर एडवीन गोम्स, ईएसआय हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारीवर्ग, पॅरामेडिकलचे डॉक्टर सावियो तसेच घरोघरी जाऊन माहिती गोळा करणारे सर्वेक्षण पथक हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत. सर्वांच्या सहकार्याने गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात आता कोरोनाबाबात तपासणी केली जाते. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. वर्षा मूंज यांच्याशी चर्चा करुन सर्व माहिती घेतली. दर दिवशी 130 रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता येथे लॅबमध्ये आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अंतर ठेवणे यापुढे लाईफ स्टाईल करा
आज राज्यात कंपन्या सुरू झाल्या आहेत, त्यांना थर्मल गन सक्तीचे केले आहे. काहीकडे त्यांचे प्रमाण कमी असले तरी कंपनीने टॅम्परेचर पाहूनच कामगारांना आतमध्ये घेणे आवश्यक आहे. राज्यात अन्य थर्मल गनची आवश्यकता असून ती आणण्यासाठी सरकर प्रयत्नशील आहे.
काही ठिकाणी पार्सल सेवा सुरू केली आहे मात्र त्यासाठी जनतेने सोशल डिस्टन्स ठेवणे तितकेच गरजेचे आहे. फक्त पोलिसांनाच दोष न देता सोशल डिस्टन्स ठेवणे यापुढे लाईफस्टील करा. आपली जबाबदारी प्रत्येकाने आपल्या परीने पाळली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आझिलोत आयसीयूची कमतरता पूर्ण करू
म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळातील पाहणी दरम्यान इस्पितळात ‘आयसीयू’ची कमतरता दिसून आली. लवकरच आयसीयू विभाग उभारू, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
डॉक्टर्सवरील हल्ल्यांबाबत कायद्याचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रयत्नाने जीआरतर्फे नवीन कायदा अस्तित्वात आणला आहे. जे कुणी डॉक्टर्सवर हल्ला करतात त्यांना कायद्यांतर्गत 1 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. या कायद्याची देशभरात नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात तशी परिस्थिती नाही. डॉक्टर्स व वैद्यकीय सेवा बजावणाऱया कर्मचारी वर्गाचा आदर केला जातो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.









