औद्योगिक कारखाना म्हटले की, मशीनची घरघर आणि यंत्रवत कामकाज हे सतत सुरू असते. मात्र एखाद्या औद्योगिक प्रकल्पाच्या ठिकाणी समाज हितासाठी अग्निहोत्रासारखा उपक्रम राबविला जाणे हे काही वेगळेच आहे. असा आगळा उपक्रम बेळगावमधील एक्स्मपर्ट इंजिनियरिंग या उद्योगात मागील 10 वर्षांपासून राबविला जात आहे. या दशकपूर्तीच्या निमित्ताने या प्रकल्पाचे संचालक विनायक लोकूर यांची तरुण भारत टीमने भेट देऊन या उपक्रमाची माहिती घेतली.
अग्निहोत्र हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतील एक विधी आहे. अग्निहोत्र हा अतिशय सोपा विधी आहे. अवघ्या 3 ते 4 रूपयांमध्ये हा विधी केला जाऊ शकतो. यामुळे वायुमंडलामध्ये शुद्धी होवून परिसरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते. बेळगावमध्येही मागील अनेक वर्षांपासून अग्निहोत्र केला जात आहे. उद्यमबाग येथील एक्सपर्ट इंजिनिअरींग या कारखान्यात मागील दहा वर्षांपासून अग्निहोत्र केला जात असून यामध्ये मालकापासून ते कर्मचाऱयांपर्यंत सर्वजण एकत्रित येऊन सकाळी व संध्याकाळी अग्निहोत्र करीत आहेत. याचा परिणाम कारखान्यातील परिसरातील चैतन्यमय वातावरणातून दिसून येत आहे.
अग्निहोत्राच्या उपासनेमुळे येथील अनेक कामगारांनी व्यसने सोडली आहेत. कामगारांना अग्निहोत्र करता यावा याकरिता विशेष खोली उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा केवळ धार्मिक विधी नसून मनाला शांती देणारा व वातावरण शुद्ध करणारा विधी आहे. यामुळेच इतर कारखान्यांमध्येही याचे अनुकरण करण्यास सुरूवात झाली आहे. सध्या कोरोनामुळे जगभरात दहशत पसरली आहे. त्यामुळे वातावरणातील शुद्धीकरणासाठी अग्निहोत्राला महत्व प्राप्त झाले आहे. आज प्रत्येकाला ताण तणावांमधून जगावे लागत आहे. त्यामुळे मन:शांती व वातावरणातील शुद्धी गरजेची आहे. अशा व्यक्तींना अग्निहोत्र हा महत्वाचा पर्याय उपलब्ध आहे. शेणी प्रज्वलीत झाल्यामुळे वातावरणातील नकारात्मक शक्तीही कमी होतात, असा साधकांचा विश्वास आहे.
व्हॉट्सऍप ग्रुपद्वारे अग्निहोत्र
बेळगावमध्ये अनेक नामवंत व्यक्तींनी एकत्र येऊन अग्निहोत्र समूह बनविला आहे. याद्वारे प्रत्येक रविवारी हे सर्वजण एका मंदिरात किंवा घरामध्ये भेटून तेथे सामूहिक अग्निहोत्र करतात. यासाठी व्हॉट्सऍप ग्रुप देखील बनविण्यात आला आहे. काही व्यक्तींकडे गाईच्या शेणी उपलब्ध नसल्यास त्यांच्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर उद्यमबाग येथील एक्स्पर्ट इंजिनियरिंग व पहिले रेल्वे गेट येथील अभय मुतालिक देसाई यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अग्निहोत्र करण्याची पद्धती
साहित्यः तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे अग्निपात्र, गोवऱयाचे 4 ते 5 तुकडे, गाईच्या दुधाचे शुद्ध तूप 2 ते 3 चमचे, अख्खे तांदूळ 4 ते 5 ग्रॅम इ.
सूर्योदय व सूर्यास्ताला तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱयांचे तुकडे ठेवावेत. त्यावर दोन चमचे तूप सोडून त्यामध्ये अग्नि प्रज्वलित करावा. आहुतीच्या तांदळांचे दोन भाग करून त्यामध्ये थोडे तूप टाकावे. मंत्रपठण करून दोनवेळा हे आहुतीचे तांदूळ अग्निहोत्रामध्ये आहुती द्यावेत. त्यांनतर त्या अग्नीकडे दोन ते तीन मिनिटे पहावे. यामुळे मनातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते. अग्निहोत्र सूर्यादय व सूर्यास्ताला करण्यात येतो. या वेळी वेगवेगळे मंत्रोच्चार करावेत.
सूर्यास्ताला
अग्नेय स्वाहा, अग्नेय दइं न मम।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम।।
सूर्योदयाला
सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम ।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम।।
अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्धी
विनायक लोकूर (संचालक एक्स्पर्ट इंजिनियरिंग)
माहेश्वरी येथे गेलो असताना तेथे अग्निहोत्राविषयी माहिती समजली. भारतातील लोकांबरोबरच परदेशातील नागरिक त्या ठिकाणी अग्निहोत्र करत होते. त्यामुळे स्वत: अग्निहोत्र करण्याचे ठरविले. यातून आत्मिक समाधान मिळू लागल्याने उद्यमबाग येथील कारखान्यातही अग्निहोत्र करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कारखान्यातील परिसर चैतन्यमय झाल्याचे त्यांनी सांगितले.









