वार्ताहर/ कारदगा
दूधगंगा, वेदगंगा नदीकाठावरील कारदगा, बारवाड, मांगूर, कुन्नूर, भोज, भोजवाडी, चाँदशिरदवाडसह नदीकाठावरील पिके महापुराच्या पाण्याने कुजून गेली आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. तेंव्हा त्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने नदीकाठावरील शेतकऱयांना एकरी 40 हजार रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई देऊन त्यांना जगण्यास बळ द्यावे, अशी मागणी कारदगा ग्रा.पं. सदस्य व तिसऱया आघाडीचे प्रमुख राजू खिचडे, ग्रा. पं. सदस्य विनोद ढेंगे, सुभाष ठकाणे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.
पत्रकार बैठकीत, 2019- 20 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱयांना एकरी फक्त 9 हजार रुपये प्रमाणे भरपाई दिली होती. त्याचवेळी महाराष्ट्र शासनाने एकरी 40 हजार रुपये प्रमाणे भरपाई दिली होती. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ म्हणून संबोधला जातो. पिके घेताना येणारा उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकट याचा विचार करुन योग्य ती भरपाई देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधांसह संबंधितांनी त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱयांना एकरी 40 हजार रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई मिळवून द्यावी. यासाठी या भागातील शेतकऱयांच्या वतीने निपाणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविणार आहोत, असे सांगून जर एकरी 40 हजार भरपाई मिळाली नाही तर आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी संजय गावडे, महादेव डांगे, रजत पटेल, बाहुबली माणगावे, अभिजित देसाई, जोतिराम अलंकार, सुदीप कांबळे, राहुल रत्नाकर, अजित खिचडे, संजय जाधव, किरण सदलगे, सुशांत नाडगे, विजय कचरे, इलाई अत्तार, शोऊकत कलावंत यांच्यासह तिसऱया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









