वाढदिवसाचे औचित्य साधून अत्याधुनिक 100 रुग्णवाहिकांचे वितरण
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अत्याधुनिक 100 रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. यातील एक रुग्णवाहिका बेळगावलाही देण्यात आली आहे. अंदाजे 25 लाख रुपये किमतीची हायटेक रुग्णवाहिका बेळगावसह सीमाभागाला देण्यात आल्याने सीमाभागातून समाधान व्यक्त केले जात आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांचे बेळगावशी जिव्हाळय़ाचे संबंध आहेत. सीमालढय़ाच्या आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला आहे. त्यामुळेच त्यांची सीमा समन्वय मंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात 100 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी हायटेक व कार्डीयाक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. यातील एक रुग्णवाहिका बेळगाव जिल्हा शिवसेनेकडे सुपूर्द करण्यात आली. शिवसेनेचे बेळगाव संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संघटक दत्ता जाधव, प्रवीण तेजम, सचिन गोरले, विजय व महिपाल यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द करण्यात आली. बेळगावमध्ये ही रुग्णवाहिका दाखल झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये तिचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर बेळगावकरांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल होईल, अशी माहिती संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांनी दिली.