वनडे क्रिकेटमध्ये रोहित-द्रविडच्या नव्या पर्वाला प्रारंभ, 3 सामन्यांच्या मालिकेत भारताच्या मध्यफळीचा कस लागणार
अहमदाबाद / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघ आपल्या 1 हजाराव्या वनडे क्रिकेट लढतीत आज (रविवार दि. 6) विंडीजविरुद्ध येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरेल, त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नव्या पर्वाला प्रारंभ होईल. उभय संघात 3 वनडे व त्यानंतर 3 टी-20 सामने होणार आहेत. आजच्या पहिल्या वनडे लढतीला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.
यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय संघ नवा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नव्याने विजयाच्या ट्रकवर येण्यासाठी प्रयत्नशील असेल. द्रविड व रोहित यांची जोडगोळी संघाला भरीव यश संपादन करुन देईल, अशी संघव्यवस्थापनाला अपेक्षा आहे.
2015 व 2019 अशा सलग दोन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये जेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर भारतीय संघ 2023 विश्वचषकासाठी नव्या रणनीतीने तयारी करणे अपेक्षित असून त्यादृष्टीने भारताला मध्यफळीतील काही समस्यांवर वेळीच मार्ग काढणे महत्त्वाचे ठरणार आहे. केएल राहुल पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने आणि स्पेशालिस्ट ओपनर्स शिखर धवन व रुतुराज गायकवाड कोरोनाग्रस्त असल्याने इशान किशन व रोहित शर्मा सलामीला उतरतील, हे यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहे.
रोहित शर्मा जागतिक स्तरावरील कोणत्याही गोलंदाजीची उत्तम चिरफाड करु शकतो आणि विंडीजच्या दुबळय़ा गोलंदाजीचा त्याने समाचार घेण्यास सुरुवात केला तर यात आश्चर्याचे कारण नसेल. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत रिषभ पंतची दुसऱया लढतीतील खेळी वगळता भारतीय मध्यफळीतील फलंदाज तिन्ही वेळा अगदीच निष्प्रभ ठरले होते.
या मालिकेत श्रेयस अय्यर उपलब्ध नाही. त्यामुळे, आक्रमक सुर्यकुमार यादव व तितक्याच तोलामोलाचा दीपक हुडा यांना उत्तम संधी असेल. यापैकी दीपक हुडाने विजय हजारे चषक स्पर्धेत उत्तम योगदान दिले. विराट कोहलीचे योगदान देखील यात विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. भारताने यापूर्वी वेंकटेश अय्यरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्यासाठी नवख्या मध्यफळीत खेळवले. पण, तो प्रयोग पूर्ण फसला होता.
गोलंदाजीच्या आघाडीवर, डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव वनडे संघात परतला असून यजुवेंद्र चहलसह अंतिम एकादशमध्ये त्याला स्थान लाभणे अपेक्षित आहे. 27 वर्षीय कुलदीप यादवने आपली शेवटची वनडे जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली असून अलीकडेच त्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. संघव्यवस्थापनाने जोधपूरमध्ये जन्मलेला गुगली गोलंदाज रवी बिश्नोईला संघात स्थान दिले असून त्यामुळे त्याला प्रारंभीच स्थान मिळणार का, हे औत्सुक्याचे असेल.
शार्दुलवर मुख्य भिस्त
जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी या अनुभवी गोलंदाजांना विश्रांती दिली असल्याने पालघर एक्स्प्रेस शार्दुल ठाकुरवर जलद गोलंदाजीची मुख्य भिस्त असणार आहे. शार्दुलने यापूर्वी जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात भेदक मारा साकारत आपली उपयुक्तता अधोरेखित केली होती. उत्तम फलंदाजीही करु शकणाऱया शार्दुलसाठी संघातील स्थान निश्चित करण्यासाठी या मालिकेत उत्तम संधी असणार आहे. मोहम्मद सिराज, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा व अवेश खान या युवा गोलंदाजांनाही सदर मालिकेच्या माध्यमातून नवे व्यासपीठ लाभू शकते.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकुर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान.
विंडीज ः केरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलन, बॉनर, डॅरेन ब्रेव्हो, ब्रूक्स, जेसॉन होल्डर, शाय होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, निकोलस पूरन, केमर रोश, रोमारिओ शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श ज्युनियर.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून.

सलामीसाठी इशान किशनशिवाय कोणताही पर्याय नाही ः रोहित
विंडीजविरुद्ध पहिल्या वनडेत इशान किशनशिवाय आणखी एकही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे, येथे माझ्यासमवेत इशानच सलामीला उतरेल, असे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले. संघात उशिराने दाखल झालेला मयांक अगरवाल सक्तीचे क्वारन्टाईन पूर्ण करत असल्याने आणि शिखर धवन, रुतुराज गायकवाड हे पहिल्या पसंतीचे खेळाडू कोरोनाग्रस्त असल्याने भारतासमोर हा पेच निर्माण झाला आहे.
धवन, गायकवाड, अय्यर पूर्ण मालिकेला मुकणार?
शिखर धवन, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड हे अद्याप आयसोलेशनमध्ये असून ते केव्हा उपलब्ध होणार, याबद्दल अगदी कर्णधार रोहितकडे देखील कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ‘सध्याच्या घडीला हे तिन्ही खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल, याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे. काही प्रसंगी 7-8 दिवस पुरेसे असतात तर काही वेळा अगदी 15 दिवस देखील पुरत नाहीत’, असे रोहित तपशीलवार बोलताना म्हणाला.
अहमदाबाद स्टेडियममधील काही माईलस्टोन्स
@सुनील गावसकर यांचा 1987 मध्ये 10 हजार कसोटी धावांचा विक्रम
@कपिल देव यांचा 1994 मध्ये सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम
@क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकरचे 1999 मध्ये पहिलेवहिले द्विशतक
@आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने 400 वा कसोटी बळी घेतला.
@भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने पहिले कसोटी शतक झळकावले.
@कपिलदेवने 1983 मध्ये विंडीजविरुद्ध 83 धावात 9 बळी घेतले.
@सचिनने 2011 वर्ल्डकप लढतीत 18 हजार वनडे धावा पूर्ण केल्या.
@1996 मध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणने लक्षवेधी कसोटी पदार्पण नोंदवले.
कोट्स
भारताला मायदेशात नमवणे सर्वाधिक कठीण असते. विंडीजविरुद्ध या मालिकेतही माझ्या दृष्टीने भारतीय संघ फेवरीट असेल. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर जी क्रमवारी निश्चित केली गेली असेल, त्यात सातत्य ठेवणे लाभदायी ठरु शकेल.
-माजी मध्यमगती गोलंदाज अजित आगरकर.
बॉक्स
यजुवेंद्र चहल-कुलदीपला एकत्रित खेळवण्याचा प्रस्ताव विचाराधीन
फिरकीपटू यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना एकत्रित खेळवण्याचा आपला विचार असल्याचे नूतन कर्णधार रोहित शर्माने यावेळी स्पष्ट केले. ‘कुलदीप व चहल यांनी सातत्यपूर्ण योगदान दिले असून ज्या-ज्यावेळी एकत्रित खेळले, त्या-त्यावेळी त्यांनी सांघिक स्तरावर आपली परिणामकता दाखवून दिली. कुलदीप बऱयाच कालावधीपासून मुख्य प्रवाहातून बाहेर आहे. पण, आम्ही त्याच्यावर अचानक दडपण आणणार नाही. याऐवजी त्याला पुरेसा वेळ देण्यावर आमचा भर असेल’, असे रोहित स्पष्टीकरणार्थ म्हणाला.
भारताची वनडेमधील कामगिरी
सामने / विजय / पराभव / टाय / निकाल नाही
999 / 518 / 431 / 9 / 41
पॉवरहिटर निकोलस पूरनवर विंडीजची भिस्त
इंग्लंडविरुद्ध मालिका गाजवणाऱया विंडीज संघाची पॉवर-हिटर निकोलस पूरनवर मुख्य भिस्त असेल. आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी सर्व प्रँचायझींचे लक्ष वेधून घेण्यासाठी पूरनसाठी देखील ही मालिका विशेष महत्त्वाची असणार आहे. कर्णधार केरॉन पोलार्ड व अनुभवी अष्टपैलू जेसॉन होल्डर लक्षवेधी योगदान देण्याची क्षमता राखून असतील.









