कोरोनाचे टेन्शन दूर करण्याचा अनोखा उपाय
कोरोना महामारीच्या या काळात लोक तणावापासून मुक्ती मिळावी म्हणून विविध प्रकारचे मार्ग अवलंबित आहेत, पण एका व्यक्तीने केलेला प्रकार ऐकून तुम्ही दंग व्हाल. टेन्शनपासून मुक्ती मिळावी म्हणून शिकागो येथील एक व्यक्ती मागील एक वर्षापासून दररोज सरोवरात उडी घेत आहे.

शिकागोमध्ये बसचालक असलेल्या डॅन ओकॉनर यांनी शनिवारी सलग 365 व्या दिवशी मिशिगन सरोवरात सूर मारला आहे. तणाव दूर करण्यासाठी मागील वर्षी शहराच्या उत्तर भागातील मोंट्रोस हार्बरच्या सरोवरात उडी मारण्यास त्यांनी सुरुवात केली होती.
महामारीदरम्यान अधिक तणाव जाणवत होता आणि निवडणुकीचे वर्ष असल्याने गोंगाटही अधिक होता. मला यापासून शांतता हवी होती. पाण्यात स्वतःला शांत वाटत असल्याने मी सरोवरात पोहण्याचा निर्णय घेतल्याचे ओकॉनर यांनी सांगितले आहे.
हिवाळय़ात सरोवर गोठल्याने त्यांना तेथे उडी घेण्यास अडचण झाली होती. पण त्यांनी बर्फाच्या थरात छिद्र पाडून त्यात पोहण्याचा आनंद घेतला आहे. पण यानंतर घरी पोहोचलेल्या ओकॉनर यांच्या शरीरावर सुमारे 20 ठिकाणी खरचटले होते.
सरोवरात उडी घेतल्याने काय लाभ होतोय अशी विचारणा लोकांनी सुरू केली होती. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली असता लोकांचे समर्थन मिळाले आणि कौतुकही होऊ लागले. सरोवरात सूर मारल्याने माझा दिवस चांगला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









