मित्राला पुस्तक पाठवायचं होतं. पाकिटात व्यवस्थित भरलं. मित्राचा पत्ता लिहिला आणि पोस्टात गेलो. अनेकदा कविसंमेलनात मंचावर डझनभर कवी आणि श्रोत्यात एकदोन माणसं अशी स्थिती असते. आज पोस्टात जनतेच्या बाजूला मी एकटा आणि खिडकीपलीकडे चारजण गूढ मौनात बुडालेले होते. मी हातातलं पाकीट समोरच्या ताईंना दिलं. त्या ते उलटसुलट न्याहाळत असतानाच वीज गेली. पाकीट परत देत हर्षभरित आणि खडूस आवाजात त्या म्हणाल्या, “वीज गेली, थोडय़ा वेळाने या.’’
“माझं घर लांब आहे हो,’’ मी कळवळलो.
“घराजवळच्या पोस्टात जा,’’ ताईंच्या ह्रदयाला पाझर फुटला नाही.
“हेच सर्वात जवळचं पोस्ट आहे.’’
“त्याला मी काय करू?’’
“पाकीट आणि पैसे ठेवून घ्या. दिवसभरात कधीही वीज आली की करा. मी उद्या येतो.’’
“आम्ही असं ठेवून घेऊ शकत नाही. तुम्ही थोडय़ा वेळाने पाकीट घेऊन या. तेव्हा वीज असेल तर तुमचं काम करीन.’’
“अहो माझं वय सदुसष्ट आहे. उन्हात खेपा मारायला झेपत नाही हो.’’
“तुम्हाला मुलं असतील, त्यांना पाठवा की.’’
आता मात्र माझा तोल गेला, “नाहीत मला मुलं. डॉक्टरकडे तपासणी केली होती. दोघांमध्ये दोष नाही. पण नियतीपुढे काय करणार?’’ “मला काय विचारताय?’’
“माझ्या मुलांचा विषय तुम्हीच काढलात. म्हणून विचारतोय. काय करू?’’ “पाकीट घेऊन थोडय़ा वेळाने या.’’
“अहो माझ्या म्हातारपणाचा थोडा तरी सहानुभूतीने विचार करा हो. तुम्ही कधीच म्हाताऱया होणार नाही का हो? वीस वर्षे काय, बघता बघता जातील. तुम्हीही म्हाताऱया आणि मग रिटायर व्हाल.’’
“वीस वर्षांचा काय संबंध? मी पुढच्या वषी रिटायर होणार आहे.’’ ताई अंमळ लाजल्याचा भास झाला, “पाकीट आणि पैसे ठेवून जा. प्रयत्न करीन.’’
“येईल हो वीज. बाहेर बघा… काँग्रेस गेली, भाजप आली, भाजप गेली, शिवसेना आली. कोणीही केव्हाही जाऊ शकतं, येऊ शकतं. मग वीज काय चीज आहे? जशी जाऊ शकते तशी येऊ देखील शकते.’’ “मग तुम्ही आत्ता घरी जाऊन थोडय़ा वेळाने पाकीट घेऊन का येऊ शकत नाही?’’ “कारण मी वीज नाही. म्हातारा आहे.’’ तेवढय़ात वीज आली.








