बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील मायक्रो फूड प्रोसेसिंग उद्योगाला चालना देण्यासाठी ‘वन डिस्ट्रिक्ट, वन प्रॉडक्ट’ (ओडॉप) योजनेच्या केंद्राच्या मंजुरीमुळे कर्नाटक आता सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्यास सज्ज झाला आहे.
या योजनेंतर्गत, निवडलेल्या उत्पादनांमध्ये सामील असलेल्या छोट्या व्यवसायांना कर्ज मिळविण्यासाठी सरकारी मदत मिळू शकते आणि त्यांच्या उत्पादनांच्या विपणनासाठी प्रशिक्षण मिळू शकते. प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादनांची निवड त्यांच्या जिल्ह्याच्या प्रचाराच्या आधारे आणि बाजारपेठेतील व्याप्ती लक्षात घेऊन केली गेली.
बेंगळूर बेकरी उत्पादने, कोडगूची कॉफी
त्याअंतर्गत किनारपट्टीच्या उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात सीफूड आणि सागरी उत्पादनांची निवड केली गेली, तर बेंगळूरमधील बेकरी उत्पादनांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे कोडगूच्या कॉफीलाही त्यात स्थान देण्यात आले आहे. कर्नाटकच्या मालनाड प्रदेशातील हा डोंगराळ जिल्हा कॉफी उत्पादनासाठी प्रसिध्द आहे आणि भारतातील एकूण कॉफी उत्पादनापैकी ३० ते ४० टक्के कॉफी उत्पादन येथे होत आहे. तसेच याला भारताचा ‘कॉफी कप’ ही म्हंटले जाते.
निवडलेल्या उत्पादनांच्या यादीमध्ये बेंगळूर ग्रामीणमधील पोल्ट्री उत्पादने,चिकमंगळूरमधील मसाले आणि शिवमोगा मधील अननस यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान – मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइझ (पीएमएफएमई) योजनेंतर्गत कर्नाटकच्या यादीस मान्यता दिली आहे. कर्नाटक राज्य कृषी उत्पन्न प्रक्रिया व निर्यात निगम लिमिटेड (केकेपीपीईसी) चे व्यवस्थापकीय संचालक शिवराजू यांनी व्यावसायिकांना मदत करण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षक असतील. एक जिल्हा पोर्टल तयार केले जाईल ज्याद्वारे अर्जदार जिल्ह्यातील निवडलेल्या उत्पादनांशी संबंधित व्यवसाय प्रस्ताव पाठवू शकतात.
या योजनेत केंद्र सरकार ६० टक्के गुंतवणूक करेल तर उर्वरित निधी राज्य सरकार पुरवेल.









