कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची हृदयद्रावक छायाचित्रं, वृत्त आपण बघत आहोत. कोरोनाची लागण झाल्यानंतर होणार्या मृत्यूंचं प्रमाण दुसर्या लाटेत वाढलं आहे. आज अंत्यसंस्कारांसाठी गर्दी होत आहे. त्यातच कोरोना रूग्णांवर अंतिम संस्कार करायला कोणी पुढे येताना दिसत नाही. रूग्णाच्या नातेवाईकांना मदत मिळत नाही. यामुळे आधीच हतबल झालेली ही माणसं अजूनच कोलमडतात. कोरोना रूग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिला जात आहे. काही जण अन्नदान करत आहेत, काही ऑक्सिजन पुरवणं, रूग्णांना खाट उपलब्ध करून देणं, रूग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करणं असं बरंच काही करत आहेत. मात्र रूग्णावर अंत्यसंस्कार करणं ही तशी मोठी कामगिरी. यासाठी आपलं मन घट्ट करावं लागतं. संवेदनशील मनाला मुरड घालावी लागते. प्रत्येकाला हे जमत नाही. पण 42 वर्षांच्या वर्षा वर्मन यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे.
वर्षा वर्मन पीपीई किट घालून रूग्णलयाबाहेर उभ्या असतात आणि मृतांच्या नातेवाईकांना अत्यंसंस्कारांसाठी लागेल ती मदत करतात. कोरोनाचा झपाटय़ाने होणारा प्रसार आणि धोके बघता हे काम नक्कीच सोपं नाही. मात्र माणुसकीचा झरा निरंतर वाहता ठेवणं आवश्यक आहे. मदतीचा हात पुढे करणं आवश्यक आहे. वर्षा वर्मन यांनी हे जाणलं आहे. कोरोनाकाळात नातेवाईकही दूर जात आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मदतीला कोणीही येत नाही. सख्खी, रक्ताचं नातं असणारी माणसंही अंत्यसंस्कार करायला धजावत नाहीत. तिकडे वर्षा अनेक अनामिक मृतांवर अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत. वर्षा लखनऊनिवासी आहेत. त्या मृतांवर अंत्यसंस्कार करत आहेत. शिवाय मोफत शववाहिनीची सेवाही उपलब्ध करून देत आहेत. वर्षा ज्युडो खेळाडू आहेत. वर्षा यांच्या मैत्रिणीचं कोरोनामुळे निधन झालं. तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात अनेक अडचणी आल्या. शववाहिन्याही उपलब्ध होत नव्हता. त्यातच अनेक ठिकाणी भरपूर शुल्क घेतलं जात होतं. ही परिस्थिती बघून वर्षा व्यथीत झाल्या. मग मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आपणच काहीतरी करायला हवं असा विचार त्यांच्या मनात आला. मग त्यांनी एक गाडी भाडय़ाने घेतली आणि तिचं रूपांतर शववाहिनीत केलं. रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत सेवा द्यायला सुरूवात केली. प्रसंगी अंत्यसंस्कारही केले. वर्षा ’एक कोशीश ऐसी भी’ या नावाने एक एनजीओ चालवतात. या संस्थेच्या माध्यमातूनही शववाहिनीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी चालक नेमण्यात आला आहे. सध्याच्या कठीण काळात निस्पृह सेवा देणार्या वर्षा वर्मन यांच्या रूपाने माणुसकी आजही जिवंत आहे असंच म्हणावं लागेल.









