ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकार यंदा प्रयत्नशील आहे. एअर इंडियासाठी अंतिम प्रक्रियेत बोली लावणाऱ्या कंपन्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार आहेत. राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याचे अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले.
एअर इंडियाच्या खरेदीसाठी बोली लावणाऱ्यांना एक काेड देण्यात येणार आहे. लिलावाच्या सर्व प्रक्रिया हा काेड वापरूनच करण्यात येतील, त्यामुळे काही ठराविक संस्था वगळता बोली लावणाऱ्यांची माहिती गोपनीय राहील.
सरकारी विभागांकडून एअर इंडियाचे 500 कोटींचे बिल थकीत
विविध सरकारी विभागांकडून एअर इंडियाला जवळपास 500 कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. या सरकारी विभागांनी एअर इंडियाच्या व्हीव्हीआयपी चार्टर्ड फ्लाईटची सेवा अनेक फेऱ्यांसाठी घेतली आहे. त्यानंतर, या विभागांनी सरकारला अद्याप पैसे दिलेले नाहीत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत या कंपनीला सरकारकडून 498.17 कोटी रुपयांचे देणे बाकी होते. नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यसभेत यासंदर्भात माहिती दिली होती.