कोरोनावरील लस लवकर प्राप्त होण्याच्या वृत्तादरम्यान ब्राझीलने झटका दिला आहे. ऍस्ट्राजेनेका आणि ऑक्स्फोर्ड विद्यापीठाच्या लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीत एका ब्राझिलियन स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असल्याचे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा एनविसाने म्हटले आहे. परंतु गोपनीयतेचा दाखला देत याबद्दल अधिक माहिती देणे टाळले आहे.
या पूर्ण प्रकरणावर ब्लूमबर्गचा अहवाल धक्कादायक आहे. अहवालानुसार संबंधित स्वयंसेवकाला लसच देण्यात आली नव्हती. संबंधित स्वयंसेवकाला लस देण्यात आली असती तर चाचणी रोखण्यात आली असती. स्वयंसेवक नियंत्रण गटाचा हिस्सा होता, ज्याला मेनिनजायटिसच औषध देण्यात आले होते, असे चाचणीशी निगडित एका सूत्राकडून सांगण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या स्वयंसेवकाचे वय 28 वर्षे होते आणि तो रियो डी जेनेरियोमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करत होता असे सांगण्यात आले आहे.
अधिक माहिती नाही
लसीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या लसीवर भारतासह जगभरातील देशांची नजर टिकून आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये या लसीचे उत्पादन सुरू आहे. तिसऱया टप्प्यातील चाचणीत सामील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पावलोने संबंधित स्वयंसेवकाबद्दल अधिक माहिती देणे टाळले आहे.
चाचणी सुरूच राहणार
फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पावलोच्या प्रवक्त्यानुसार चाचणीत सामील झालेल्या 10 हजार स्वयंसेवकांपैकी 8 हजार जणांना ब्राझीलच्या 6 शहरांमध्ये लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यातील अनेकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतरही लसीची चाचणी सुरूच राहणार आहे. लसीच्या सुरक्षेवरून चिंता करण्याची गरज नसल्याचे ऑक्सफोर्डच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
अमेरिकेत चाचणी बंद
तत्पूर्वी सप्टेंबरमध्ये ब्रिटनमध्ये लसीच्या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यानंतर जगभरातील चाचण्या रोखण्यात आल्या होत्या. परंतु अमेरिका वगळता उर्वरित सर्व ठिकाणी चाचण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत.









