प्रतिनिधी / पणजी
महाराष्ट्र सरकारकडून गोव्याला संवेदनशील राज्य जाहीर करणे गोव्यातील राजकारण्यांच्या वर्मी लागले असून त्यातूनच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ’गोव्याबद्दल ऍलर्जी’ आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करत आहोत, असे गोवा शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी म्हटले आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राने केवळ गोव्यालाच संवेदनशील म्हटलेले नाही. तसे असते तर आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यास काहीतरी अर्थ राहिला असता. परंतु महाराष्ट्राने गोव्यासह अन्य कित्येक राज्यांनाही संवेदनशील म्हटले आहे, अशावेळी गोवा आरोग्यमंत्र्यांना एवढे वाईट वाटण्याचे कारण काय? असा सवाल कामत यांनी केला आहे.
महाराष्ट्राने जाहीर केलेल्या निर्णयास खरे तर गोवा सरकार आणि स्वतः आरोग्यमंत्रीच जबाबदार आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. गोव्यात आज कोणतेही नियंत्रण, निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पर्यटक बिनधास्त वावरत आहेत, पॅसिनो खुलेआम चालतात, कुणाला कुणाची भीती राहिलेली नाही, आरोग्यमंत्र्यासारखी जबाबदार व्यक्ती स्वतःचे दोष इतरांवर ढकलतात, असे प्रकार येथे सुरू आहेत.
ठाकरे यांना ’गोव्याबद्दल ऍलर्जी’ असल्याचे वक्तव्य करणाऱया आरोग्यमंत्र्यांनाच खरे तर ’महाराष्ट्राबद्दल ऍलर्जी’ आहे. कारण यापूर्वी राणे यांनी गोवा-महाराष्ट्रातील सीमा भागात राहणाऱया लोकांवर गोमेकॉत उपचार करण्यास बंदी घातली होती, याची आठवण कामत यांनी करून दिली. अशावेळी राणे सारख्या व्यक्ती महाराष्ट्राकडून कटुता घेत असतील तर भविष्यात त्याचे परिणाम गोव्याला भोगावे लागतील, असा इशाराही कामत यांनी दिला आहे.
कोविड महामारीचा गैरफायदा घेत गोवा सरकार आडमार्गाने अनेक गैरकृत्ये करत असून त्यामुळेच राज्यातील जनतेला वारंवार आंदोलने करावी लागत आहेत, रस्त्यावर उतरावे लागत आहे, असा आरोप कामत यांनी केला.









