वृत्तसंस्था / ऍथेन्स
संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारी परिस्थितीने थैमान घातल्याने 7-8 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेली 2020 सालातील ऍथेन्स मॅरेथॉन रद्द करण्यात आल्याची घोषणा स्पर्धा आयोजकांनी शुक्रवारी केली.
ऍथेन्स मॅरेथॉन ही प्रत्येक वषी यशस्वीपणे ग्रीक ऍथलेटिक्स फेडरेशनतर्फे भरविली जाते. सदर मॅरेथॉन 42 किलोमीटर पल्ल्याची राहते. 2020 च्या ऍथेन्स मॅरेथॉनसाठी स्पर्धा आयोजकांतर्फे इच्छुकांसाठी प्रवेशाचे आवाहन करण्यात आले. पण कोरोनाची परिस्थितीसंपूर्ण जगामध्ये पुन्हा बिकट होत असल्याचे चित्र पहावयास मिळाल्याने या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱया स्पर्धकांची संख्या खूपच कमी होत असल्याचे स्पर्धा आयोजकांना जाणवले. 1972 साली पहिल्यांदा ऍथेन्स मॅरेथॉन आयोजित केली होती. त्यानंतर प्रत्येक वषी या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांच्या संख्येमध्ये खूपच वाढ होऊ लागली. गेल्या काही वर्षांमध्ये स्पर्धकांची संख्या किमान 15 हजार असल्याचे जाणवले. कोरोनाच्या भीतीमुळे यावषी स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शविला. त्यामुळे सदर मॅरेथॉन रद्द करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. प्रत्येक वषी विविध देशांमध्ये प्रमुख सहा मॅरेथॉन घेतल्या जातात. पण आता कोरोनामुळे यावषी बर्लिन, न्यूयॉर्क, बोस्टन आणि शिकागो मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या एप्रिलमध्ये होणारी लंडन मॅरेथॉन कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आली असून आता ती 4 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. कोरोना महामारीच्या संकटात ग्रीसमध्ये किमान आतापर्यंत 400 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 19 हजार जणांना याची बाधा झाली आहे.









