मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत कृषी अधिकाऱयांना आदेश : आधारभूत किमतीच्या वितरणासाठी कागदपत्रे तयार करण्याचेही निर्देश
प्रतिनिधी / सांगे
सांगे मतदारसंघातील ऊस उत्पादक, ऑर्किड उत्पादक तसेच ट्रक व्यावसायिकांच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषी खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्यासमवेत बैठका माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घडवून आणल्या. यावेळी शेतकऱयांना भेडसावणाऱया अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकांना वरि÷ कृषी अधिकारीही उपस्थित होते. सर्व ऊस उत्पादकांना त्यांनी पुरवठा केलेल्या ऊसाच्या रकमेपैकी प्रति टन 1200 रुपये याप्रमाणे पहिला हप्ता ताबडतोब चुकता करण्याचा आदेश याप्रसंगी कृषी अधिकाऱयांना देण्यात आला. तसेच आधारभूत किमतीच्या रकमेचे शेतकऱयांना वितरण करण्यासंदर्भात कागदपत्रे ताबडतोब तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
संजीवनी कारखान्याची दयनीय स्थिती पाहता ऊसाच्या पिकाला भवितव्य नसल्याने आतापर्यंत ऊस उत्पादकांना सरकार जसे आर्थिक साहाय्य करत आलेले आहे तसेच पुढील पाच वर्षांपर्यंत दुसऱया पिकाकडे वळण्यासाठी अनुदान देण्यात यावे अशी मागणी यावेळी ऊस उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर कृषिमंत्र्यांनी याविषयी सर्व ऊस उत्पादकांना विश्वासात घेऊन एक स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा, सरकार त्यावर सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ऊस उत्पादकांतर्फे हर्षद प्रभुदेसाई, फ्रान्सिस मास्कारेन्हस, दयानंद फळदेसाई व मनोज पर्येकर हजर होते.
पॉलीहाऊसेसना भेट देण्याचे निर्देश
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू असल्याने ऑर्किड उत्पादकांचे पीक वाया जात असून त्यामुळे सध्या ऑर्किड उत्पादक लाखो रुपयांच्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने सदर शेतकऱयांना या कठीण काळात बँकेचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मदत करावी अशी मागणी करण्यात आली असता कवळेकर यांनी कृषी अधिकाऱयांना एकूण नुकसानाचा अहवाल सादर करण्यासाठी सर्व पॉलीहाऊसेसना भेट देण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.
ट्रकांना परत आणण्याची व्यवस्था करावी
गोव्यात खनिजमाल वाहतूक बंद असल्यामुळे कित्येक ट्रक व्यावसायिकांनी आपले ट्रक शेजारच्या राज्यांत कामासाठी पाठविले होते. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना परत गोव्यात येणे शक्य होत नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले असता त्या सर्वांना परत गोव्यात आणण्यासाठी आवश्यक परवाना देऊन ताबडतोब व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले.
सांगे भाजपतर्फे 1 लाखाची मदत याप्रसंगी सांगे भाजप मंडळातर्फे ‘कोविड-19’संदर्भातील मुख्यमंत्री साहाय्य निधीसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्यासह सुरेश केपेकर, सदानंद गावडे, सुभाष वेळीप आदी उपस्थित होते. तसेच कुर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष फ्रान्सिस मास्कारेन्हस, उपाध्यक्ष मनोज पर्येकर व सचिव संजू नाईक यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.









