प्रतिनिधी/ फोंडा :
ऊस पिकावरली थकलेली रक्कम सरकारकडून शेतकऱयांना त्वरित फेडली जावी. तसेच यंदाच्या गळीत हंगामात संजीवनी साखर कारखाना सुरु होईल की नाही, याची लेखी हमी द्यावी, यासह शेतकऱयांच्या अन्य मागण्या 25 सप्टेंबरपर्यंत मान्य न झाल्यास 29 सप्टेंबरपासून संजीवनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा गोमंतक ऊस उत्पादक संघटनेने दिला आहे. संघटनेच्या काल मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत ऊस शेतकऱयांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
ऊस शेतकऱयांना थकबाकी त्वरित द्यावी
मागील हंगामातील ऊसावरील थकलेली रक्कम तसेच ऊस तोडणीसाठी सरकारकडून मिळणारी रक्कम अद्याप शेतकऱयांना मिळालेली नाही. शिवाय साधारण 2200 मेट्रिक टन ऊस मागील हंगामात तोंडणी न करताच शेतात राहिला होता. या ऊसावरील रक्कम शेतकऱयांना फेडण्याची मागणी संघटनेने केली आहे. ही रक्कम अद्याप शेतकऱयांच्या पदरी न पडल्याने बँकेचे हप्ते थकले आहेत. शिवाय कामगारांना देण्यासाठीही शेतकऱयांकडे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने तातडीने ही थकबाकी फेडण्याची मागणी शेतकऱयांनी केली आहे.
आता तोंडी नको, लेखी आश्वासन द्यावे
संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारचे धोरण अनिश्चित असल्याने यंदाच्या गळीत हंगामात कारखाना सुरु होणार की, बंद राहणार हे स्पष्ट करावे असे शेतकऱयांचे म्हणणे आहे. शेतकऱयांच्या सर्व मागण्यांवर तोंडी आश्वासन नको, तर लेखी उत्तर देण्याची मागणी संघटेनेने केली आहे.
लेखी हमी न मिळाल्यास 29 पासून आंदोलन
येत्या 25 सप्टेंबरपर्यंत सरकारकडून लेखी हमी न मिळाल्यास 29 सप्टेंबरपासून कारखान्याच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला. बैठकीला ऊस उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष हर्षद प्रभूदेसाई, सचिव दामोदर गवळी तसेच इतर सदस्य उपस्थित हेते.









