प्रतिनिधी/ पणजी
कृषी खात्याचे संचालक नेविल आल्फान्सो यांनी दि. 10 जून 2021 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार गोव्यातील ऊस लागवड करणाऱया शेतकऱयांना सतत 5 वर्षे सरकार आर्थिक साहाय्य करणार आहे. संजीवनी साखर कारखान्यामार्फत ही योजना जाहीर करण्यात आली आहे व शेतकऱयांकडून ऊस खरेदीची तयारी दर्शविली आहे.
शेतकऱयांनी ऊसाची लागवड करावी. ऊस कापण्यास आणि तो कारखान्यापर्यंत आणण्यास सरकार अथवा संजीवनी कारखाना मदत करणार नाही अथवा आर्थिव साहाय्य करणार नाही, मात्र त्या शेतकऱयांकडे केलेल्या लागवडीचा अंदाज घेऊन दरवर्षी 80 मेट्रिक टन प्रति हेक्टर या प्रमाणे ऊस घेतला जाईल.
पहिल्या वर्षी (2020-21) प्रत्येक टनामागे 3 हजार रुपये, दुसऱया वर्षी (2021-22) 2 हजार 800 रुपये, तिसऱया वर्षी (2022-23)2600 रुपये चौथ्या वर्षी (2023-24) 2400 रुपये तर पाचव्या वर्षी (2024-25) 2200 रुपये दिले जाणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.
शेतकऱयांना योजना अमान्य
सदर अधिसूचनेसंबंधी काही ऊस लागवड शेतकऱयांशी संपर्क साधला असता, ही योजना त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या दोन वर्षांचा आधार निधीही सरकारने दिलेला नाही. दरवर्षी उत्पन्नाचा खर्च वाढतो व पहिल्या वर्षापेक्षा अधिक किंमतीने ऊस खरेदी केला जातो. पण पहिल्या वर्षी चांगली किंमत देऊन नंतर किंमत कमी करत जाण्याचा हा निर्णय विचित्र असून शेतकरी संघटना त्यावर योग्य भाष्य करेल, असे ते म्हणाले. ऊस लागवड शेतकऱयांमध्ये दोन संघटना असून या संघटनांमध्ये एकमत नसल्याने आधार निधी जाहीर होत नसल्याचे यापूर्वी सरकारने विधानसभेत जाहीर केले होते.









